महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शहरात ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरविण्याची अभिनव योजना सुरू करण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून या योजनेतून शहरात १७०० किमी लांबीचे जाळे पसरविण्यात येणार असून या प्रकल्पातून महापालिकेच्या तिजोरीत १५ ते २० कोटी रुपये उत्पन्नाची भर पडेल असा दावा स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केला आहे.
आधुनिक युगात मोबाईल, इंटरनेट, टीव्ही यासारख्या सुविधा आज काळाची गरज झाली आहे. एकाच केबलद्वारे या सुविधा दिल्या जाऊ शकतात त्यासाठी अनेक कंपन्याकडून विचारणा केली जात आहे. एका कंपनीकडून जाळे पसरवून घेऊन महापालिकेतर्फे अन्य कंपन्यांना व्यावसायासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सध्या स्थितीत शहरात महापालिकेचे १५६ किमी केबलचे जाळे आहे, ९०० किमी लांबीच्या नाल्या, २०० किमी इलेक्ट्रिक केबलच्या लाईन आहेत. सोबतच वापरात नसलेल्या ४०० ते ५०० किमी जुन्या पाईपलाईन आहेत. २४ बाय ७ योजनेतंर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत असल्याने अनेक किमी जुन्या पाईपलाईन निरुपयोगी ठरणार आहेत. या लाईनचा उपयोग केबल डक्ट पसरविण्यासाठी होऊ शकतो. खोदकामाची फारशी गरज भासणार नाही.
या योजनेसाठी रोडमॅप बनविणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपनीची नियुक्ती करण्यासाठी आठवडय़ाभरात ईओआय मागविण्यात येत आहे. यानंतर या कामासाठी इच्छुक कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. त्यांनाच ही यंत्रणा उभारून द्यायची आहे. या बदल्यात त्यांना या केबलचा निशुल्क उपयोग करता येणार असून उर्वरित कंपन्यांना मात्र शुल्क देऊन त्याचा वापर करता येणार आहे. या शिवाय भविष्यात नाली खोदण्याची गरज भासल्यास केबल असलेल्या नाल्यांचाही उपयोग करता येणार आहे. यामुळे मुलभूत सुविधांवर होणारा खर्च सुद्धा कमी होईल. एचएफसीएल कंपनीला ९०० किमी केबलची गरज असून ४५० किमीचे केबल टाकण्याची परवानगी कंपनीने मागितली आहे.बीएसएनएलचे ५०० कि.मी. नेटवर्क असले तरी त्यांनी त्यांना शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पोहचण्यासाठी केबलची गरज असून त्यांचे अधिकारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या सर्व प्रकल्पातून महापालिकेचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि नागरिकांना आजच्या आधुनिक काळात त्याचा उपयोग होईल. एकदा ही यंत्रणा पूर्ण झाल्यानंतर रोबोटच्या मदतीने केबल हलविणे शक्य आहे. या प्रकारची यंत्रणा सिंगापूरसह अन्य शहरात विकसित करण्यात आली असल्याचे ठाकरे म्हणाले.