पालिकेच्या शाळा शिक्षकांविना ओस

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेत शिकविणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ऐन सहामाही परीक्षेच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ठाणे महापालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेत शिकविणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ऐन सहामाही परीक्षेच्या काळात विधानसभा निवडणुकीच्या कामात जुंपण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. महिनाभरावर येऊन ठेपलेली विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा आणि विधानसभेची निवडणूक अशा दुहेरी कामामुळे शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. या दोन्ही कामांचा भार एकाच वेळी पेलणे कठीण आहे. अशीच काहीशी अवस्था खासगी शाळेतील शिक्षकांची असून ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना सुट्टी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिकेच्या १२९ प्राथमिक, तर १३ माध्यमिक शाळा असून प्राथमिक शाळेत ११६५, तर माध्यमिक शाळेत ४० हून अधिक शिक्षक आहेत. यंदाही विधानसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी या शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून जसे आदेश प्राप्त होऊ लागले आहेत. त्यानुसार निवडणूक कामाच्या ठिकाणी शिक्षकांची रवानगी होऊ लागली आहे. प्राथमिक शाळेतील ११६५ शिक्षकांपैकी १०२७ शिक्षक सध्या निवडणूक कामात व्यग्र आहेत. मतदार पावत्यांचे वाटप, मतदार यादीतील कामे अशा स्वरूपाची कामे निवडणुकीच्या दहा ते पंधरा दिवस आधी शिक्षकांकडे दिली जातात.  या निवडणूक कामांचे प्रशिक्षण घेण्यासाठी  शिक्षकांना कार्यशाळेत जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांविना वर्गात बसावे लागत आहे. ऐन निवडणुकांच्या काळात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा होणार आहे. मात्र ही परीक्षा महिनाभरावर येऊन ठेपली असतानाच शिक्षकांवर निवडणूक कामांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती पालकांकडून व्यक्त होऊ लागली आहे.
खासगी शाळांपुढेही पेच..
ठाणे महापालिकेच्या प्राथमिक तसेच माध्यमिक शाळेतील शिक्षकांप्रमाणेच शहरातील खासगी शाळांमधील शिक्षकांवरही विधानसभा निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणूक कामाच्या प्रशिक्षणाकरिता या शिक्षकांना कार्यशाळेत हजेरी लावावी लागत असल्यामुळे खासगी शाळेच्या संचालकांपुढे मोठा पेच निर्माण झाला असून शिक्षकांअभावी शाळा भरविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corporation school teachers on election duty