नवे क्रीडापटू घडविण्यात अपयशी
कर्मचाऱ्यांच्या क्रीडागुणांना संधी मिळावी या उद्देशाने सुरू केलेल्या मुंबई महापालिकेच्या क्रीडा भवनास उतरती कळा लागली असून एकेकाळी अखिल भारतीय आंतर महापालिका स्पर्धामध्ये मर्दुमकी गाजविणाऱ्या या क्रीडा भवनाला क्रीडापटूंची वानवा भासू लागली आहे. बक्कळ उत्पन्न मिळत असल्याने क्रीडा भवनाची आर्थिक स्थिती उत्तम आहे. मात्र नवे क्रीडापटू घडविण्याच्या नावाने बोंब आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच ग्रहण या क्रीडा भवनाला लागले आहे.
महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रीडागुणांना संधी मिळावी यासाठी या क्रीडा भवनाची स्थापना करण्यात आली. विविध स्पर्धामध्ये क्रिकेट, कबड्डी, खो खो, टेबल टेनिस, कॅरम, फुटबॉल, बॅडमिंटन, शूटिंगबॉल, व्हॉलीबॉल, नेमबाजी, गोळाफेक, लांब उडी आदी १५ क्रीडा प्रकारांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मर्दुमकी गाजविली होती. एकेकाळी पालिकेचे क्रिकेटचे तीन संघ होते, पण आता एकच संघ उरला आहे. महिलांचा कबड्डी संघ इतिहासजमा झाला असून पुरुष संघाचीही वाताहत झाली आहे. खो खोची अवस्थाही अशीच आहे. फुटबॉल, शूटिंगबॉल, व्हॉलीबॉल, नेमबाजी, गोळाफेक, लांब उडी आदी क्रीडा प्रकार नावालाच उरले आहेत.
 टेबल टेनिस अपवाद ठरला आहे. स्पर्धाचे निमित्त पुढे करून खेळाडूंसाठी कपडे, क्रीडा साहित्याची अधूनमधून खरेदी केली जाते; परंतु पालिकेचे खेळाडू अभावानेच स्पर्धामध्ये दृष्टीस  पडतात.
महापालिकेकडून क्रीडा भवनाला दर वर्षी एक लाख पाच हजार रुपये मिळतात. क्रीडा भवनचे सदस्य असलेल्या पालिकेच्या आठ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दर महिन्याला ३० रुपये वर्गणी घेतली जाते. क्रीडा भवनचे बॅडमिंटन, लॉन टेनिसचे कोर्ट असून ते भाडय़ाने दिले जाते. स्वत:चे लॉन टेनिस कोर्ट असूनही क्रीडा भवनाला आजतागायत एकही लॉन टेनिसपटू घडविता आलेला नाही. या कोर्टचा वापर केवळ विवाह सोहळ्यांसाठी होत असून एक दिवसाच्या भाडय़ापोटी क्रीडा भवनाला ३०,००० रुपये मिळतात. शिवाजी पार्कवरील पालिकेची खेळपट्टी भाडय़ाने देण्यात आली असून पालिकेच्या संघाला मात्र आझाद मैदानावरील भाडय़ाच्या खेळपट्टीवर सराव करावा लागत आहे.
शिवाजी पार्क येथील होर्डिगपोटी वर्षांला सहा लाख रुपये मिळतात. उत्पन्नाच्या या स्रोतांमुळे क्रीडा भवनाला वर्षभराला १८ ते २० लाख रुपये उत्पन्न मिळत आहे; परंतु खेळाडू घडण्याच्या नावाने क्रीडा भवनाकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही.
पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या पालिका आयुक्तांनीच आता क्रीडा भवनाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

साडेसदतीस हजारांचे तिकीट गेले कुठे?
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची एकूण ५२ तिकिटे पालिकेला विकल्याची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पावत्यांवरून मिळते. मात्र पालिका भवनाच्या दफ्तरी उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरून केवळ ५१ तिकिटे मिळाल्याची नोंद आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील साडेसदतीस हजार रुपयांना खरेदी केलेल्या तिकिटाचा हिशेब आजतागायत देण्यात आलेला नाही. ते तिकीट नेमके कोणाला आणि किती रुपयांना दिले ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.