शहरात मलेरिया आणि डेंग्यूच्या आजाराने थमान घातले आहे. एकीकडे या आजाराने खासगी आणि पालिकेचे रुग्णालये तुडुंब भरली असताना पालिकेची सफाई यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप करत मंगळवारी महासभेत सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनसह आयुक्त आणि महापौरांना धारेवर धरले.
नवी मुंबई शहरात डेंग्यूच्या आजाराची लक्षणीय वाढ झाली आहे. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापौर आणि आयुक्तांनी शहरात पाहणी दौरे करून स्वच्छतेचा आढावा घेतला तर विरोधी पक्ष नेत्यांनी देखील विविध नोडमध्ये सफाई कामाचा लेखाजोखा घेतला. मात्र या दौऱ्यानंतरही आणि खुद्द आयुक्तांनी आदेश देऊनही प्रशासकीय यंत्रणेकडून साफसफाई होत नसल्याची ओरड मंगळवारी झालेल्या महासभेत सर्वच सदस्यांनी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक त्यांच्याबरोबरच विरोधी पक्षांचे नगरसेवक यांनी या प्रश्नांबाबत महापौर आणि आयुक्तांना सफाई यंत्रणेचा आढावा घेण्याचे विनंती करीत मलेरिया आणि डेग्यूंसाठी आता पर्यंत केलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. प्रशासकीय यंत्रणा सफाई मोहिमेत अपयशी ठरत असेल तर त्याला जबाबदार कोण असेल, असा सवाल सदस्यांनी उपस्थित केला. आयुक्तांनी याबाबत लक्ष वेधत ५ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत मलेरिया निर्मूलनासाठी स्वच्छता अभियान आणि विविध शिबिरांची आखणी केल्याचे सांगितले. महापौर सागर नाईक यांनी ५ ते २३ नोव्हेंबर या कालावधीला वाढ करीत येत्या ३१ नोव्हेंबपर्यंत शहरात मलेरिया डेंग्यू आजार नियंत्रणाबातची मोहीम राबवण्याचे निर्देश दिले.