भाजपची दोषींवर कारवाईची मागणी
नगर परिषदेत फेब्रुवारी-मार्च २०१३ मध्ये मागासक्षेत्र अनुदान निधी व पर्यटनविकास कार्यक्रम निधीतून सीएसआर दरापेक्षा दुप्पट दर देऊन सोडियम व हायमास्ट लाइटची खरेदी प्रकरणात  झालेल्या आर्थिक घोटा़ळ्याची चौकशी करावी, अशी मागणी भंडारा नगर परिषदेतील भाजप नगरसेवकांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन देऊन केली आहे.
नगर परिषदेकडून शहरात फेब्रुवारी-मार्चमध्ये १५० नग, २५० व्ॉट आणि १४४ नग, ७० व्ॉटचे सोडियम व हायमास्ट दिवे लावण्यात आले. याचे कंत्राट नागपूरच्या एका कंपनीला देण्यात आले. या कंपनीला ७० व्ॉट सोडियम फिटिंगचा सीएसआर दर प्रतिनग २७६३ रुपये असताना ६३५० रुपये देण्यात आला, तसेच २५० व्ॉट सोडियम फिटिंगचा  सीएसआर दर ४२८६ रुपये असताना ७२५० रुपये प्रतिनग दिला गेला. सीएसआर दराने सोडियम फिटिंगची खरेदी १० लाख ४० हजार ७७२ रुपयांऐवजी २० लाख १ हजार ९०० रुपयात केली गेली, तसेच सीएमआर दराप्रमाणे १२.५० मीटर हायमास्ट लाइटची किंमत २ लाख १४ हजार ७५१ रुपये असताना  ५ लाख ३३ हजार ५५८ रुपये दिले गेले. १६ मीटर हायमास्ट लाइटचा सीएसआर दर २ लाख ६५ हजार ८५३ रुपये असताना ६ लाख ९६ हजार ९८५ रुपये देण्यात आले.
अशाप्रकारे झालेल्या लोकनिधींच्या गैरवापराच्या चौकशीची मागणी केली गेली. जिल्हधिकाऱ्यांना या प्रकरणात भेटणाऱ्या शिष्टमंड़ळात भाजपचे मधुरा मदनकर, आशा उईके, संध्या धनकर, सूर्यकांत इलमे, शमीम शेख, नितीन नागदेवे, विकास मदनकर, संजय मते, शैलेश मेश्राम, लोकेश रंगारी, मोरेश्वर मते, विजय लुटे, लक्ष्मीकांत थोटे, आरिफ शेख, विवेक बांते, अजीज शेख, देवीदास कुंभलकर, श्याम दलाल, गोलू लांजेवार, सतीश सार्वे व  संजय  पटले हे होते.