राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव देण्याची शिफारस कापूस पणन महासंघाच्या आमसभेने करूनही कृषिमूल्य आयोगाने ४ हजार रुपये दर निश्चित केल्याने कापूस उत्पादक अडचणीत आल्याची माहिती महासंघाचे संचालक नामदेवराव केशवे यांनी दिली.
 दर वाढीच्या अनुषंगाने केशवे यांनी कृषिमंत्री शरद पवार यांना पत्र पाठविले आहे. कृषिमूल्य आयोग शेतकरी विरोधी व व्यापारीधार्जिना असल्याचे त्यात नमूद केले.
नांदेडसह अनेक जिल्ह्य़ांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सोयाबीन हातातून गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षा कापसाच्या पिकावर होत्या; पण सरकारने ४ हजाराचा दर निश्चित केल्याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला असल्याचे केशवे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, दिवाळीच्या सुमारास कापूस बाजारात आला. गतवर्षी शेतकऱ्यांना तीन हजार ९०० रुपये भाव मिळाला. त्यात फक्त शंभर रुपयांची वाढ म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचा प्रकार आहे.
शेतमालाचे भाव ठरविण्याची जबाबदारी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कृषिमूल्य आयोगावर आहे. कापसाच्या शेतीवर एकरी होणारा खर्च, बी-बियाणे व खतांचा दर, वीज खर्च तसेच मजुरी या सर्वाचा विचार केला तर आयोगाने कापसाला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये देऊन संकटातल्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले. यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढेल, अशी भीती केशवे यांनी व्यक्त केली.
जिल्ह्य़ात रविवारी भोकर व किनवटजवळच्या बोधडी येथे कापूस खरेदी सुरू होणार असली तरी सरकारने दिलेला अत्यल्प दर लक्षात घेता आमच्या केंद्रावर कापूस कोण आणणार, असा सवाल केशवे यांनी केला. कृषिमूल्य आयोगावर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी, अशी मागणी केशवे यांनी केली. हा आयोग केवळ ग्राहकांचे हित जपणारा नव्हे तर शेतमालाचे उत्पादन करणाऱ्यांच्या बाजूने विचार करणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विदर्भाच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी कापसाच्या हमी भावात वाढ करण्याचे संकेत दिले होते. परंतु आतापर्यंत भाववाढ अमलात आलीच नाही. गेल्या वर्षी शेतकऱ्यांचा कापूस संपल्यावर कापसाचे दर वाढले. त्याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना झाला. या वर्षीही कापसाचे भाव उशिरा वाढले तर त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होणार आहे. अतिपावसाने उडीद व मुगाचे उत्पन्न झाले नाही. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे कापूस निघाला की तो बाजारात जाणार आणि परिणामी शेतकऱ्यांना कमी भाव मिळणार आहे, असे दिसून येते.
शेतक ऱ्याची आत्महत्या
हदगाव तालुक्यातील शिरड येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे विषारी औषध पिऊन ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता आत्महत्या केली. शिरड येथील शिवारात मारोती देविदास शिनगारे (३०) याने विषारी औषध प्राशन केले. यानंतर नांदेड येथे संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले असता उपचार सुरू असताना ३ नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला.