मुंबई महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४४ चे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक सिरील डिसोजा यांच्यासह एकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. एका जागेच्या कुंपण घालण्याच्या कामाला परवानगी मिळवून देण्यासाठी त्यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती.  फिर्यादीची मालाडच्या मालवणी भागातील राठोडी गावात मोकळी जागा आहे. या जागेला त्यांना कुंपण घालायचे होते. या कामास हरकत न घेणे तसेच कामाला पालिकेतून परवागनी मिळवून देण्यासाठी नगरसेवक सिरील डिसोजा यांनी १ लाख रुपायांची लाच मागितली होती. फिर्यादीनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार सोमवारी मालवणीच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. यावेळी सिरील यांनी पुन्हा फिर्यादीकडे पी/उत्तर प्रभागाच्या इमारत व कारखाने विभागासाठी पुन्हा ५ लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर लाचेच्या रकमेचा ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना सिरील डिसोजा आणि त्यांचा साथीदार सिद्दिक युसूफ अन्सारी यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. यापूर्वीही सिरील डिसोजा यांच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Councilors syria dsouza arrested accepting bribes
First published on: 02-09-2015 at 12:40 IST