मुंबई विद्यापीठाचा वाढत्या कारभाराच्या विकेंद्रीकरणाच्या उद्देशाने विद्यापीठाने रत्नागिरी, ठाणे आणि कल्याण येथे उपकेंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातील ठाणे उपकेंद्राचे कामकाज यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होणार असून ६० विद्यार्थी क्षमता असलेले पाच वर्षांचे अभ्यासक्रम या उपकेंद्रात सुरू होणार आहेत. १६ जुल रोजी या उपकेंद्राचे उद्घाटन होईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांनी दिली. त्यानंतर १ ऑगस्टपासूनउपकेंद्रात कामकाज सुरू होणार आहे.
ठाणे जिल्ह्यात उच्च शिक्षणाचे पर्याय अगदीच मर्यादित असल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मुंबईत जावे लागते. त्यामुळे ठाण्यात विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. पालिकेने २००७ मध्ये ढोकाळी येथील २६ हजार १५१ चौरस मीटर जागा विद्यापीठाला हस्तांतरित केली. मात्र, गेली पाच वष्रे विद्यापीठाकडून त्यावर काहीही बांधकाम करण्यात आले नव्हते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी सातत्याने हे उपकेंद्र मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.  या उपकेंद्राची पाहणी विचारे आणि प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र, सिनेट सदस्य महादेव जगताप यांनी नुकतीच केली. या उपकेंद्राच्या इमारतीत बीएमएस- एमबीए आणि बीबीए – एलएलबी हे दोन इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. वर्गखोल्यांसह सेमिनार हॉल, कॉन्फरन्स रूम, ग्रंथालय, अल्पोपहारगृह, उद्यान, वाहनतळ, मदान आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.