तटाकडील तालीम मंडळाच्या बचत खात्यावरील रक्कम बोगस खात्यावर हस्तांतरित करून संस्थेची फसवणूक केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने जुना राजवाडा पोलिसांना दिले आहेत. नारायण बाबुराव सुतार (वय ५७, रा. शिवाजी पेठ) खजानीस तटाकडील तालीम मंडळ यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे या संदर्भात फिर्याद दाखल केली होती.    
महेश बाळासाहेब जाधव, अभिजित जाधव, राजेंद्र जाधव (सर्व रा.तटाकडील तालीमजवळ, शिवाजी पेठ) व एका बँकेच्या शाखाधिकाऱ्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपींचा तटाकडील तालीम मंडळात पदाधिकारी, खजानीस म्हणून धर्मादाय न्यासाकडे काडीमात्र संबंध नसतांना व तालमीच्या मिळकतीबाबत न्यासाकडे बदल अर्जानुसार धर्मादाय आयुक्तांचा अर्ज नामंजूर केलेला असताना आपणच पदाधिकारी असल्याचे भासवून या चौघांनी ८९ हजार ६०० रुपयांचा अपहार केल्याचे सुतार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. या चौघांनी खोटी कागदपत्रे तयार करून एका बँकेतून स्वत उघडलेल्या खात्यावर रक्कम बेकायदेशीर हस्तांतरित केली. यासाठी धर्मादाय आयुक्तांची परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे तटाकडील तालीम मंडळाचे खजानीस नारायण सुतार यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेऊन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी महेश जाधव यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.    
दरम्यान मंडळाचे सेक्रेटरी राजेंद्र जाधव यांनी तालमीचे अध्यक्ष महेश जाधव यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी केलेले राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप सुतार यांच्यावर केला आहे. नारायण सुतार हे सन २००३ पर्यंत तालमीच्या खजानीस पदावर कार्यान्वित होते. तसेच राजेंद्र जाधव, महेश जाधव, अभिजित जाधव यांनी मराठा सहकारी बँकेतील रकमेची ठेव ही संस्थेच्या बचत खात्यावर वर्ग केली आहे. ती आजही या खात्यावर जमा आहे, असे स्पष्टीकरणही सचिव जाधव यांनी केले आहे. तक्रारदार सुतार हे बिअरबार, परमीट रूम चालवितात, त्यांच्या विरोधात अनधिकृत बांधकामाची तक्रार देखील आहे, असेही जाधव यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.