दुसरे वरिष्ठ सहदिवाणी न्यायाधीश महेश नातू यांच्या न्यायालयाने चित्रपट अभिनेत्री करिष्मा कपूर हिला २९ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी केला आहे. निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटीने ३५ लाखांच्या वसुलीसाठी दावा दाखल केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने हा समन्स जारी केला. निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप सोसायटीने उमरेड रोडवरील सूतगिरणी परिसरात निर्मल नगरी उभारली आहे. या नगरीचे उद्घाटन २५ जानेवारीला भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी करिष्मा कपूर ही प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होती. त्यासाठी मॅट्रिक्स इंडिया एंटरटेनमेंट कन्सल्टन्ट्स या कंपनीसोबत लेखी करार करण्यात आला होता. तिला चार लाख रुपये अग्रिम रक्कम देण्यात आली होती. परंतु ऐनवेळी मुलाची प्रकृती बिघडल्याचे कारण सांगून करिष्मा ही या सोहळयात हजर झाली नाही. त्यामुळे सोसायटीचे मोठे नुकसान झाले.
सोसायटीने करिष्माविरुद्ध नंदनवन पोलीस ठाण्यात विश्वासघाताची तक्रार नोंदवली होती.
परंतु प्रकरण अदखलपात्र स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी सोसायटीला न्यायालयात दाद मागण्याची समज दिली होती. त्यानुसार सोसायटीने करिष्मा कपूरविरुद्ध ३५ लाखांच्या नुकसानभरपाईच्या वसुलीसाठी दावा केला.
न्यायालयाने करिष्माला हजर होण्याच्या दिवशी किंवा समन्स मिळाल्यापासून ३० दिवसात या दाव्यावर तिचे म्हणणे काय आहे याबाबत लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
येत्या २९ तारखेला सकाळी ११ वाजता वैयक्तिकरित्या किंवा वकिलामार्फत हजर राहावे, असा समन्स न्यायाधीशांनी जारी केला आहे. करिष्मा स्वत: येणार नसून ती वकिलांमार्फत उपस्थिती दर्शवणार असल्याची माहिती आहे.