जळावू लाकडामध्ये घट आल्याचे कारण सांगून प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम स्मशान घाटांवर बिनबोभाट सुरू आहे. या चोरीकऱ्यांमध्ये स्मशानघाट कर्मचारी, लिपीक व वरिष्ठ अधिकारी या सर्वाचीच मिलिभगत असल्याचे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाजीखाये आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी स्मशानघाटातील लाकडांच्या हिशेबाची माहिती मिळवण्यासाठी दहनघाट आणि महापालिकेतील संबंधित विभागात अनेक खेटा घातल्या आहेत. माहितीच्या अधिकारात त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार गेल्या आठ वर्षांत एकूण १० घाटांवर ७६,९०२ प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी ठेकेदाराने पुरवलेले लाकूड आणि प्रत्येक वर्षी शिल्लक राहिलेले लाकूड याचा हिशेब काढल्यास प्रत्यक्षात १,०९,७१६ प्रेतांवर अंत्यसंस्कार व्हायला हवे होते. मात्र, परस्पर या लाकडाची विल्हेवाट लावण्यात आली. प्रत्येक प्रेतामागे ३०० किलो लाकूड स्मशानघाटावरून मिळते. मात्र त्यातही पूर्ण लाकडे दिली जात नाहीत. घाटाच्या नावावर गोदामात लाकूड पडून असते. त्यावर प्रत्येक महिन्यात १० टक्के घट दाखवून ती लाकडे गायब केली जातात, असेच यातून ध्वनित झाले आहे.  
वाळलेलेच लाकूड स्मशानघाटावर घेतले जात असताना १० टक्के घट होणे अशक्यप्राय गोष्ट आहे. स्मशानभूमीवर लाकडांचा संग्रह असताना पुन्हा ठेकेदारांकडून लाकूड बोलावले जाते. उदाहरणार्थ एप्रिल २०१०मध्ये मानेवाडा घाटावर ९२१ टन लाकडाचा संग्रह असतानाही १०४ टन लाकूड पुन्हा बोलावण्यात आले. जेव्हा की एप्रिलमध्ये या घाटावर ११२ प्रेतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ३३.६ टन लाकूड वापरण्यात आले आणि ९९ टक्के लाकडाची घट दाखवण्यात आली. भाजीखाये म्हणाले, अंबाझरी घाटावर दिलेला हिशेब तर हास्यास्पद होता. लाकूड, गोवरी, रॉकेलच्या हिशेबाच्या फाईलला उदई लागल्याचे दोन महिन्यांनी त्यांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे सर्वाधिक २४,७८५ प्रेतांवर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्यावर केवळ ९,२६६ प्रेतांसाठी महापालिकेच्यावतीने लाकूड मोफत देऊ केले. बाकी १५,५१९ प्रेतांवर समाजसेवा संस्थांनी लाकडांची पूर्तता केली. तरी संस्थांची सेवा महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी रद्द केली.
सर्वात कमी प्रेतांवर दिघारी घाटावर अग्निसंस्कार करण्यात आले. आश्चर्य म्हणजे ६२ टक्के लाकडाची घट झाल्याचे महापालिकेच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. मोक्षधाम घाट सोडून २,००१ प्रेतांचे दहन डिझेल भट्टीत करण्यात आले. गंगाबाई घाट, वैशालीनगर, अंबाझरी घाटावर डिझेल भट्टय़ा व्यवस्थित सुरू आहेत. मोक्षधामवर डिझेल भट्टीचे रूपांतर गॅस भट्टीत करण्यात आले. मात्र गॅसभट्टी बंद करण्यात आली. मोक्षधाम घाटावर ४८ व्यावसायिक गॅस जोडणी आहेत. त्याचे मूल्य दोन लाख एवढे आहे. मात्र ते उगीचच बंद अवस्थेत ठेवण्यात आले आहेत. कदाचित लाकडामध्ये मिळणारी वरकमाई डिझेल किंवा गॅस भट्टींद्वारे होत नसावी, त्यामुळे भ्रष्टाचाराच्या वाळवीने स्मशानघाटातील लाकडे पोखरली गेली आहेत.