दोन वर्षांपूर्वी पाणीपुरवठा करताना अधिकारी व ठेकेदारांनी केलेल्या टँकर घोटाळ्याची दखल घेत जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात ठेकेदारांविरोधात गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला. इतर ठिकाणीही कारवाई होणार असतानाच प्रशासकीय यंत्रणेकडून चौकशीचा अहवाल देण्यास टाळाटाळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी येत्या ४ दिवसांत दोन्ही विभागांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना अहवाल देण्याचा आदेश बजावला आहे. साहजिकच टँकर घोटाळ्यात अडकलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्य़ात पावसाअभावी पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर २००९-१०मध्ये ठेकेदारांमार्फत पाणीपुरवठा करताना तालुका पंचायत समिती स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करताना पाणी भरण्याच्या ठिकाणाचे अंतर जास्तीचे दाखवून लाखो रुपये उकळले. राजकीय वरदहस्त असल्याने तक्रारी झाल्यानंतरही टँकर घोटाळ्याची कोणीच दखल घेतली नाही. जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मात्र गांभीर्याने दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांना या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश बजावले.
पाटोदा तालुक्यात टँकरची वाहतूक करताना भायाळ ते दासखेड हे १० किलोमीटर अंतर असताना तब्बल ३० किलोमीटर दाखविले. हा प्रकार चौकशीत उघड झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन उपअभियंता एस. एम. घुबडे व तत्कालीन कंत्राटदार रामदास हंगे यांच्याविरोधात पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याच पद्धतीने इतर पाचही तालुक्यांत टँकर घोटाळा झाला. परंतु या बाबत चौकशी अहवाल देण्यास टाळाटाळ होत असल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता थेट कारवाई करतात, हे समजल्यानंतर या घोटाळ्यात अडकलेल्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनी चौकशी करणाऱ्यांकडून अहवाल जाऊ नये, या साठी प्रयत्न सुरू केले. पाटोदा येथे गुन्हा दाखल होऊन महिन्याचा कालावधी लोटला, तरी बीड व अंबाजोगाई उपविभागीय अधिकाऱ्यांनी इतर चार तालुक्यांतील अहवाल दिला नसल्यामुळे तो तत्काळ द्यावा, असे आदेश बजावण्यात आले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्यांचे धाबे दणाणले आहे.