गावच्या यात्रेत नाटकातील गाणे ‘वन्समोअर’ करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान खूनप्रकरणात झाले. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथे घडलेल्या या खूनप्रकरणात गावच्या सरपंचाचा सहभाग आढळून आल्याने त्यास पोलिसांनी अटक केली.
अक्कलकोटचे माजी आमदार महादेव पाटील यांचा पुतण्या असलेला जेऊर गावचा सरपंच महांतेश ऊर्फ महांतेश्वर चंद्रकांत पाटील (वय ४१) याच्यासह त्याचे मित्र बसवराज शंकर पुजारी (वय २६) व आडव्यप्पा कल्लप्पा गौडगाव (वय ३१) यांना अटक झाली असून त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यातील महांतेश पाटील याच्यावर दोन वर्षांपूर्वी सोलापुरात सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या मोटारीवर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याचा आरोप आहे. या प्रलंभित खटल्यात जामिनावर सुटलेल्या महांतेश पाटील याच्याविरूध्द आता खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
जेऊर गावात गेल्या २० नोव्हेंबर रोजी राजशेखर शिवलिंगप्पा तुकमाळी (वय ३७) या तरुणाचा मृतदेह छिन्नविच्छन्न अवस्थेत आढळून आला होता. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद होऊन तपासात श्वानपथकाची मदत घेतली असता श्वान जेऊर गावात महांतेश पाटील यांच्या शेतापर्यंत जाऊन माघारी फिरले. त्यामुळे पोलीस तपास यंत्रणेचा संशय बळावला. यात महांतेश पाटील व त्याच्या साथीदारांकडे चौकशी केली असता अखेर गुन्ह्य़ाची उकल झाली. २० नोव्हेबर रोजी गावची यात्रा होती. त्या रात्री नाटकाचा प्रयोग सादर होत असताना सरपंच महांतेश पाटील व त्याचे साथीदार नाटक पाहण्यासाठी गेले होते. त्यामुळे नाटकातील गाण्याला वन्समोअर करण्यावरून महांतेश पाटील व मृत राजशेखर तुकमाळी यांच्यात वाद झाला. त्यातून रागाच्या भरात राजशेखर याचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी या गुन्ह्य़ाचा तपास केला.