चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिली की काय होते, ते औरंगाबाद महापालिकेकडे पाहिल्यास लक्षात येते. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यासाठी निधीचा पाठपुरावा नेहमी होतो. निधी देणार आहोत, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मनपातील शिवसेनेच्या कारभारावर टीका केली. कन्नड येथे आयोजित सभेत चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची या वेळी उपस्थिती होती.
राजकीय वातावरणावर भाष्य करीत चव्हाण म्हणाले की, गेल्या १० वर्षांत विकासाचा वेग इतिहासात सर्वाधिक असा नोंदविला जाईल. केंद्रातील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीसह राज्य सरकारनेही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. ऐन दुष्काळात एकाही कुटुंबाला कुठे स्थलांतर करावे लागले नाही, हे मोठे यश आहे. शेंद्रा, बिडकीन परिसराचा मोठा विकास होईल. हज हाऊस उभारणीची तयारी पूर्ण झाली. त्याचे भूमिपूजन लवकरच होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विज्ञान केंद्र उभारण्यासाठी १० कोटींचा निधी दिला. विधी विद्यापीठाचा निर्णय झाला आहे, ही यादी वाचताना राज्यस्तरावर घेतलेले विविध निर्णयही चव्हाण यांनी सांगितले.
विरोधक प्रत्येक कार्यक्रमात शिवीगाळ करतात, नुसतीच टीका करतात. त्यांचा दृष्टिकोन, आराखडा सांगत नाहीत. वृत्तवाहिन्यांना खरेदी करून प्रचार सुरू आहे. अनेक प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. विकासाचा दृष्टिकोन असणाऱ्या व्यक्तींकडे सत्ता असायला हवी. गेल्या काही वर्षांत स्थिर सरकार देऊ शकल्यामुळे केंद्रात व राज्यात विकासाचा वेग वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना-भाजपवर टीका करताना औरंगाबादच्या महापालिकेचे उदाहरण दिले. सत्ता चुकीच्या हातात आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी मोहन प्रकाश यांनी आम आदमी पार्टी, भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. रामदेवबाबांवरही ते कडक शब्दांत बोलले. ते म्हणाले की, सकाळी एक डोळा झाकून टीव्हीवर तो बाबा येतो ना. अंडरवेअर, बनियनपासून त्याचे अनेक धंदे आहेत. सगळीकडे घोळ आहे. काळा पैसा परत आणण्याच्या तो बाता मारतो. त्याच्याकडून सरकारला कसे प्रमाणपत्र घेणार? आंदोलनाला बसला, तेव्हा पोलीस आल्यानंतर सलवार घालून पळाला.
रामदेवबाबांवर टीका करताना नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या चहा पे चर्चा कार्यक्रमावरही त्यांनी टीका केली. ‘चर्चा चाय पर और खर्चा दो सौ करोड’ अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या कार्यक्रमाची खिल्ली उडविली. माणिकराव ठाकरे यांनीही राज्यात चांगले काम सुरू असल्याचा उल्लेख केला.