मागील आठवडयात मागील आठवडय़ात शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा संपली असून दिवाळीची सुट्टी लागली आहे. त्यामुळे बच्चे कंपनीपासून तरुणाई ते वृद्धापर्यंत सुट्टीचे बेत रचण्यात येऊ लागले आहे. सुट्टीमुळे कोणी गावाला, मामाकडे जात आहे. कोणी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडत असून कोणी सुट्टीचा आनंद घेत पिकनिकसाठी जात आहे. त्यामुळे ठाणे- पनवेल रेल्वे स्थानकांवर व ऐरोली, कोपरखरणे, सीबीडी, सारसोळे, नेरुळ, वाशी आदी डेपो प्रवाशांच्या गर्दीने भरलेली दिसून येत आहेत. दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असा जल्लोष करीत बच्चे कंपनीनेही सुट्टी लागताच आनदोत्सवाला सुरुवात केली आहे. दीपावलीचा आनंद लुटण्यासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी बच्चे कंपनी आतुरलेली असतात. परीक्षांच्या धामधुमीतून ताणतणावातून मुक्त झालेल्या या बच्चे कंपनीला मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागले आहेत. तसेच विवाहित महिलांना माहेरी जाण्याची ओढ आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाची नगरी म्हणून ओळखण्यात येणारी नवी मुंबईत परराज्यातून शिक्षणासाठी आलेले महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्यांनादेखील दिवाळीच्या सुट्टी लागल्याने गावी जाण्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे रेल्वे, बस डेपोमध्ये दिवसभर गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे बसमध्ये चढण्यासाठी व रेटारेटीतून मार्ग काढण्यासाठी अनेकांची तारांबळ उडत आहे. विशेषता महिला वर्गाला यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
सतर्क राहवे
बस स्थानकावर व रेल्वेला होणाऱ्या गर्दीमुळे पाकीटमार, भुरटया चोरांचा धोका वाढला आहे. दिवाळीत महिला मोठय़ा प्रमाणात दागदागिने घेऊन प्रवास करीत असतात. तसेच खरेदीसाठी देखील अनेकजण रोख रक्कम जवळ बाळगत असतात. अनेक वेळा खिसे कापण्याचे, मोबाइल फोन चोरण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.