लातूर लोकसभा मतदारसंघासाठी तब्बल २९ इच्छुकांनी काँग्रेसकडे आपले उमेदवारीअर्ज दाखल केले. मंगळवारी काँग्रेस भवनमध्ये टी. पी. मुंडे व प्रकाश येलगुरवाल, मधुकरराव चव्हाण यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख व जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे आदी या वेळी उपस्थित होते. लातूर लोकसभेसाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे अर्ज प्राप्त झाले व त्यांनी मुलाखती दिल्या. नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव हे मात्र मुलाखतीस उपस्थित नव्हते. मात्र, त्यांचा अर्ज दाखल झाला होता. विद्यमान खासदार जयवंत आवळे यांच्या समर्थकांनी आवळे यांचे काम चांगले असल्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी भूमिका पक्षश्रेष्ठींसमोर मांडली.
भाजपप्रमाणेच काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया पार पाडली. उमेदवार निवडीचे सर्वाधिकार दिल्लीतच असल्याची चर्चा काँग्रेस भवनात होती. जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, सभापती बालाजी कांबळे, प्रा. शिवाजी जवळगेकर, मोहन माने, प्रा. रामकिशन सोनकांबळे, सुनीता आरळीकर, जयंत काथवटे यांच्यासह २९जणांनी उमेदवारीवर दावा केला.
लातूर लोकसभेचे पक्षनिरीक्षक व पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी या वेळी बोलताना, काँग्रेसचा विचार सर्वधर्मसमभावाचा आहे, तर महायुती जातिपातीच्या राजकारणात अडकली आहे. नरेंद्र मोदींचे वादळ येईल आणि संपूनही जाईल. यापूर्वीही काँग्रेसने अशी अनेक वादळे अनुभवली आहेत. ती तात्कालिक असतात, याची सर्वाना माहिती आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विचारावर ठाम राहून निवडणुकीत उतरले पाहिजे. बिनबुडाचे आरोप करण्यात गुंतलेल्या आम आदमी पक्षाची काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगितले. काँग्रेसमुळेच लोकशाही जिवंत असल्याचे डॉ. निलंगेकर यांनी सांगितले. लातूरची जागा १ लाख मतांनी निवडून आणू, असा विश्वास आमदार देशमुख यांनी काँग्रेस भवन येथे पक्षाच्या बठकीत व्यक्त केला.