कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील पब्लिक प्रॉयव्हेट पार्टीसिफेशन या तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या सिटी स्कॅन सेंटरला महापालिकेने सील ठोकले आहे. सेवा मुदत संपुष्टात आल्यानंतरही या सीटी सेंटर चालकांनी रुग्णालयातील जागा अनधिकृतपणे अडविली होती. त्यामुळे महापालिकेने या सेंटरमधील सर्व साहित्य व कागदपत्रे सील करून उर्वरित मोकळी जागा रुग्णालयाच्या ताब्यात दिली आहे. करारामध्ये नमूद केलेल्या दरांपेक्षा जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी रुग्णांनी प्रशसानाकडे केल्या होत्या. यातूनच रुग्णालय प्रशासन व सेंटर चालक यांच्यात करारातील अंतर्गत वादातून गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे सेंटर बंद अवस्थेत होते.
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मे. साई सिटी स्कॅन सेंटर सुरू होते. महापालिकेने पब्लिक प्रॉयव्हेट पार्टिसिफेशन (पीपीपी) या तत्त्वावर हे काम दिले होते. मात्र, सेवा मुदत संपुष्टात आल्यानंतरही या संस्थेने अनधिकृतपणे जागा अडवून ठेवली होती. याप्रकरणी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी संबंधित संस्थेला जागा रिक्त करण्याबाबत नोटीस बजावली होती.
या नोटीसनंतरही संस्थेने सीटी स्कॅन सेंटरची जागा रिक्त केली नव्हती. त्यामुळे आयुक्त असीम गुप्ता यांनी या सिटी स्कॅन सेंटरवर सील ठोकण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाने या सीटी स्कॅन सेंटरचे कुलूप तोडून सर्व साहित्य व कागदपत्रे सील केली आणि सेंटरमधील उर्वरित मोकळी जागा महापालिकेच्या ताब्यात दिली, अशी माहिती महापालिकेने दिली.
कळवा रुग्णालयांतर्गत चालणाऱ्या या सिटी स्कॅन सेंटर चालक करारामध्ये नमूद केलेल्या दरांपेक्षा जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी रुग्णालय प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने सेंटरचे काम थांबविले होते. त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेने संस्थेला पुन्हा काम सुरू करण्याची संधी दिली होती.
मात्र, त्यासाठी सात लाखांचे थकीत वीज बिल सेंटर चालकांकडून भरून घेण्यात आले होते.
तसेच जागेचे भाडे आणि त्यावर १८ टक्के दराने व्याज लावण्यात आले होते. त्यानंतर स्कॅन सेंटरमधील मशीनमध्ये बिघाड झाल्याने काही महिने सेंटर पुन्हा बंद होते. अशा प्रकारे रुग्णालय प्रशासन आणि सेंटर चालक यांच्यात करारावरून अंतर्गत वाद सुरू होता. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून हे सेंटर बंद होते, अशी माहिती महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.