झेंडय़ाच्या वादातून दोन गटांत निर्माण झालेल्या संघर्षांमुळे गेल्या तीन दिवसांपासून जिल्हय़ातील उदगीर शहरात संचारबंदी लागू आहे. पोलीस महानिरीक्षक संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी डॉ. बिपीन शर्मा, पोलीस अधीक्षक बी. जी. गायकर, अतिरिक्त अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे रविवारी दिवसभर ठाण मांडून होते. दरम्यान, परिस्थितीत चांगली सुधारणा होत असल्याने सोमवारी दुपारी काही काळासाठी संचारबंदी शिथिल केली होती. उद्याही दुपारनंतर ती शिथिल केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी शहरात शांतता कमिटीची बैठक घेतली. आमदार सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंद केंद्रे, बसवराज पाटील नागराळकर, नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, मंजूरखान पठाण, नसीम सिद्दिकी, मनोहर पटवारी, तहसीलदार सुभाष काकडे आदी या वेळी उपस्थित होते. उदगीरच्या ऐतिहासिक परंपरेची जपणूक करण्यासाठी नागरिकांनी शहरात शांतता ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. आतापर्यंत १२०जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे नोंदवले आहेत. शहरात शांतता ठेवण्यासाठी ६ पोलीस उपअधीक्षक, ८ निरीक्षक, २३ सहायक निरीक्षक, २०७ पोलीस, आरसीपीचे ७ जवान व एसआरपीएफच्या २ कंपन्या तैनात केल्या आहेत. उदगीर शहरात एस. टी. महामंडळाची बससेवाही थांबवली आहे. त्यामुळे दररोज उदगीरला जाणे-येणे करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. उद्या (मंगळवारी) स्थितीत सुधारणा झाल्यास काही काळासाठी संचारबंदी शिथिल केली जाईल व त्यानुसार संचारबंदी वाढवायची की कमी करायची हे ठरणार आहे.