लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आणि कडक उन्हाची तीव्रता येथे शिगेला पोहोचली आहे. सकाळी सात वाजतापासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली असून लोकसभेत नेमकी बाजी कोण मारणार? याचीही चर्चा जोरात आहे.
गेल्या शनिवार व रविवारी अकाली पावसाने हजेरी लावल्यानंतरही आता पुन्हा एकदा कडक उन्हाळा तापायला सुरुवात झाली आहे. एप्रिलच्या शेवटच्या व मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सूर्याचा पारा ४४.६ अंश सेल्सिअसवर पोहचला होता. आज पारा ४२ व ४३ अंशावर असला तरी सकाळी सात वाजतापासून उन्हाचे चटके बसत आहेत. सकाळपासूनच कडक उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने शहरातील सर्व रस्ते ओस पडले असून संचारबंदीसारखी स्थिती आहे. रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही. शहरातील मुख्य गोल बाजार उन्हामुळे ओस पडला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लोकांनी घराच्या बाहेर पडणे बंद केले आहे. उन्हाचा परिणाम शासकीय कार्यालयात सुध्दा बघायला मिळत आहे.  जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी कार्यालयातच कुलर, एसीमध्ये बसून काम करतानाचे चित्र बघायला मिळत आहे. तर सेतू केंद्र व अन्य शासकीय कामाच्या ठिकाणची गर्दी ओसरली आहे. उन्हामुळे शीतपेय, ऊसाचा रस, आईस्क्रीम व थंड पदार्थाच्या विक्रीत वाढ झालेली आहे. तसेच उन्हाचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सुध्दा त्रास सहन करावा लागत आहे. औद्योगिकीकरणामुळे चंद्रपुरातील तापमानात प्रचंड वाढ होत असल्याचे अभ्यासक सांगतात. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र तसेच येऊ घातलेल्या अन्य खासगी वीाज प्रकल्पांमुळे सुध्दा तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे. केवळ दिवसाच नाही तर रात्री उन्हाचा उकाडा कायम राहत असल्याने शहरातील लोकांना रात्री सुध्दा गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे दोन दिवसांसाठी शहरातील तापमानाचा पारा ३६ अंशावर आले होते. परंतु आता पारा ४३ पर्यंत गेल्याने जूनच्या मध्यापर्यंत तरी चंद्रपूरकरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. एकीकडे उन्हाची तीव्रता शिखरावर पोहचली असतानाच लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सुध्दा शिगेला पोहोचली आहे. १६ मे रोजी मतमोजणी होणार असल्याने चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून नेमका कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार याविषयी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महायुतीचे हंसराज अहीर, कांॅग्रेसचे संजय देवतळे व आपचे अ‍ॅड.वामनराव चटप यांच्यात चुरशीची लढत आहे. या लढतीत शेवटच्या क्षणी कोण बाजी मारेल याविषयी पैजा लागत आहेत. त्यात इलेक्ट्रॉनिक मिडियाने सर्वेक्षणात महाराष्ट्रातून आपची एक जागा निवडणूक येण्याची शक्यता वर्तविल्याने आपच्या कार्यकर्त्यांमध्ये तर उत्साहाचे वातावरण आहे. परंतु तिकडे भाजपोव कॉंग्रेसने सुध्दा विजयाची खात्री वर्तविल्याने तिरंगी चुरशीची उत्सुकता कमालीची ताणल्या जात आहे.