डोंबिवलीत भारत पेट्रोलियमच्या घरगुती सिलिंडरचा पुरवठा करणाऱ्या तीन नवीन गॅस एजन्सी सुरू करण्यात आल्या आहेत. या एजन्सी पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी डोंबिवलीतील भारत पेट्रोलियमच्या (बीपी) एजन्सींना सक्तीने आपल्या एजन्सीतील तीन ते चार हजार ग्राहक देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याने एजन्सी चालक चिंताग्रस्त तर, ग्राहकांच्या संतापाच्या भडक्यात भर पडली आहे.  
भारत पेट्रोलियम गॅस एजन्सी चालवणाऱ्या जुन्या पाच चालकांना नव्याने सुरू होणाऱ्या तीन गॅस एजन्सींना ग्राहक पुरवठा करण्याची सक्ती करण्यात येत आहे. एका एजन्सीकडून सुमारे तीन ते चार हजार ग्राहक देण्याची सक्ती करण्यात येत आहे. ग्राहकांना पूर्वकल्पना न देता या प्रक्रिया कराव्या लागत आहेत, असे एजन्सी चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. या आदेशाला विरोध केला तर नाहक त्रास देण्यात येईल, या भीतीने उघडपणे कोणीही बोलण्यास तयार नाही. नवीन एजन्सी सुरू राहण्यासाठी किमान तीन ते चार हजार ग्राहकांची गरज असल्याने, डोंबिवलीत जुन्या एजन्सीकडून गॅस घेणाऱ्या सुमारे दहा ते बारा हजार ग्राहकांची पळवापळव, ससेहोलपट या नवीन व्यवस्थेत होणार असल्याचे बोलले जाते. पूर्व भागातील भारत पेट्रोलियमच्या काही ग्राहकांना ठाकूरवाडी भागात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पूर्व भागातील ग्राहकाला गॅस सिलेंडर, कागदपत्रांची देवाणघेवाण करायची असेल, काही माहिती एजन्सीतून घ्यायची असेल तर ग्राहकाला १०० रूपये खर्च करून गॅस एजन्सीचा रस्ता धरावा लागणार आहे.

लोकप्रतिनिधीच्या एजन्सी?
काँग्रेसमधील एका बडय़ा नेत्याच्या या एजन्सी असल्याचे एजन्सी चालकांच्या चर्चेतून समजते. या बडय़ा नेत्याचे आघाडी सरकारच्या काळात चांगले वजन होते. त्या वजनाचा भार  ग्राहकांवर कशासाठी, असे प्रश्न ग्राहकांकडून करण्यात येत आहेत.

* डोंबिवली पश्चिमेत ठाकूरवाडी, पूर्व भागातील तुकारामनगर आणि ठाकुर्लीमध्ये भारत पेट्रोलियम कंपनीच्या घरगुती सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या तीन एजन्सी नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत.
* या एजन्सी पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी भारत पेट्रोलियम एजन्सी चालवणाऱ्या शहरातील पाच जुन्या एजन्सी चालकांवर वरिष्ठ पातळीवरून दबाव टाकण्यात येत आहे.
* एका एजन्सीमध्ये सुमारे १५ ते २० हजार ग्राहक आहेत.
* २० ते ३० वर्षांपासून स्थानिक गॅस एजन्सीशी नाते निर्माण झाल्यामुळे ग्राहक परक्या भागात असलेल्या नवीन गॅस एजन्सीत जाण्यासाठी तयार नाहीत.
* काही ग्राहकांनी आम्हाला दुसऱ्या गॅस एजन्सीत स्थलांतरित करू नये म्हणून जुन्या एजन्सी चालकांना पत्रेही दिली आहेत.

डोंबिवलीत दोन नवीन एजन्सी सुरू झाल्या आहेत. ठाकुर्ली भाग वेगळा आहे. तेथे नवीन एजन्सी सुरू करण्यात आली आहे. पण, ग्राहकांना त्रास होईल, अशा पद्धतीने गॅस ग्राहक जोडण्यात येत नाहीत. ग्राहकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्याशी संपर्क करावा.
– देवदास दारपल्ली, विक्री अधिकारी, बीपी