पालिकेला नाही दिसली!
ठाणे, कळवा, मुंब्रा तसेच आसपासच्या शहरांच्या खाडीकिनारी असलेल्या खारफुटीची एकीकडे मोठय़ा प्रमाणावर कत्तल सुरू असली तरी यासंबंधीची कोणतीही ठोस माहिती ठाणे महापालिकेकडे मात्र उपलब्ध नाही. इंधन, कोळंबी शेतीच्या नावाने ठाणे जिल्ह्य़ात गेली अनेक वर्षे खारफुटीची अशी बेसुमार कत्तल सुरू आहे. परंपरागत व्यवसायाच्या नावाखाली हे सगळे सुरू असले तरी खाडीकिनारी उभी राहणारी बेकायदा बांधकामे हे या जंगलांच्या ऱ्हासामागील मुख्य कारण असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. तरीही आतापर्यंत किती प्रमाणात खारफुटी कापली गेली आणि त्यामुळे खाडीच्या पर्यावरणाचा कसा ऱ्हास झाला यासंबंधीचा कोणताही ठोस पुरावा पर्यावरण विभागाकडे नाही. ठाण्याची खाडी आणि उल्हास नदीच्या पात्रातली तिवरांची जंगले भूमाफियांकडून गिळली जात असताना किती क्षेत्रावरील जंगले कापली गेली हे प्रशासकीय यंत्रणांना ठाऊक नसल्याने ‘खारफुटी कापली.. आम्ही नाही पाहिली’, अशीच स्थिती सध्या या भागात आहे.
ठाणे जिल्ह्य़ाला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात असलेल्या खाडीकिनारी सुमारे चार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात खारफुटीची जंगले पसरली आहेत. उल्हास नदीच्या पात्रात खाडीचे पाणी शिरते. त्यामुळे येथेही खारफुटीचा मोठा पट्टा तयार झाला आहे. तिवरांची ही विस्तीर्ण जंगले खरे तर येथील खाडी पात्रांचे वैशिष्टय़ म्हणायला हवीत. ठाण्याच्या पश्चिमेकडे असलेले मुंब्रा तसेच दिवा खाडीचे पात्र काहीसे अरुंद असले तरी तेथेही तिवरांची मोठी जंगले आढळून येतात. मात्र, गेल्या १५ वर्षांपासून जंगलांचा हा सगळा पट्टा वेगाने घटला असून त्यामुळे खाडीच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने मध्यंतरी केलेल्या एका सर्वेक्षणात हा पट्टा पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले असले तरी किती क्षेत्रातील खारफुटी कापली गेली आहे, याची कोणतीही माहिती या विभागाकडे नसल्याची कबुली पर्यावरण विभागामार्फत देण्यात आली आहे.
खारफुटीच्या प्रजाती घटल्या
भारतातील वेगवेगळ्या खाडीकिनारी सापडणाऱ्या खारफुटीत ६०पेक्षा अधिक प्रजातींच्या वनस्पती आढळतात. ठाण्यातील खाडीत मारंदी, काजळा, बेन, जव, कांदळ, चिपी अशा स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती सापडत असत. मात्र, खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणावर भरणी करून उभ्या राहिलेल्या बेकायदा बांधकामांनी या प्रजाती गिळण्यास सुरुवात केली असून त्यामुळे या खारफुटीत आढळणारे खेकडे, िझगे, कोळंबी या जलचरांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण झाला आहे. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात खारफुटी, येऊर जंगलाच्या टेकडय़ा तसेच संजय गांधी उद्यानाच्या काही भागांत होणारे अतिक्रमण याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली असून वेळीच हे रोखले नाही, तर शहराच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
खाडीचे गटारीकरण सुरूच
ठाणे खाडीचे प्रदूषण हा तसा जुनाच विषय असला तरी ते रोखण्यासाठी स्थानिक प्राधिकरण म्हणून महापालिकेला अद्याप फारसे काही करणे जमलेले नाही. ठाणे, कळवा आणि मुंब्रा या तीन शहरांमधून निघणारे सांडपाणी अजूनही थेट खाडीत सोडले जाते. बडय़ा बाता मारणाऱ्या ठाणे महापालिकेला शहरातून निघणाऱ्या एकूण सांडपाण्यापैकी जेमतेम १७ टक्के सांडपाण्याचे निचरा नियंत्रण शक्य झाले आहे. खाडीच्या शुद्धिकरणाची भाषा करीत महापालिकेने केंद्र सरकारकडून विकास निधीच्या नावाखाली कोटय़वधी रुपयांचा निधी जमा केला आहे, हे विशेष. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागांत प्रक्रिया केंद्रे उभी केली जात आहेत. परंतु या केंद्रांची गुणवत्ता चाचणी नियमितपणे होत नाही, असा धक्कादायक निष्कर्ष ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने काढला आहे. नवी मुंबई महापालिकेने मध्यंतरी खाडीकिनारी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी नवी केंद्रे उभी करून खाडी प्रदूषित होऊ नये, यासाठी मोहीम हाती घेतली होती. ठाणे महापालिकेस इतक्या वर्षांत असे काही जमलेले नाही, अशा स्वरूपाचा निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे.