शिक्षण हा सर्व मुला-मुलींचा मूलभूत हक्क असून त्यापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून शासन स्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. तरीही अद्याप अनेक गावांमध्ये चौथीपर्यंत शाळा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या गावांमध्ये जावे लागते. लांबचे अंतर आणि दळणवळणाच्या साधनांचा आभाव यामुळे विद्यार्थ्यांना गावातून मोठी पायपीट करत शाळेचे ठिकाण गाठावे लागते. या अशा पायपिटीमुळे विद्यार्थ्यांमधील शाळेची गोडी कमी होते. ते सारखे आजारी पडतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी वाढावी आणि लांबवर असणाऱ्या शाळेचा प्रवास सुकर व्हावा म्हणून वी-वंडर्स अ‍ॅण्ड एक्सप्लोरर सामाजिक संस्था, सृजन चॅरिटेबल ट्रस्ट आणि आकांक्षा ग्रुप या संस्थांच्या वतीने सायकल देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. रविवार ९ नोव्हेंबर रोजी डहाणू तालुक्यातील कोटेबी गावामधील आदिवासी विद्यार्थाना या सायकलींचे वितरण केले जाणार आहे.
डहाणू तालुक्यातील कोटेबी  हे अवघ्या ३५० घरांचे पंधराशे लोकवस्तीचे छोटेखानी गाव. या गावामधील सर्वच रहिवासी शेती आणि मोलमजुरीतून उदरनिर्वाह करतात. मुंबई, ठाणे शहरांपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या या गावांत शिक्षणाच्या फारशा सुविधा नाहीत. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सुमारे १२ ते १५ किलोमीटरचे अंतर पार करून डहाणू हे तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. वेळेवर बस गाडय़ा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी हे अंतर पूर्णपणे चालून पार करतात. उन्हातान्हातून केली जाणारी ही पायपीट विद्यार्थ्यांसाठी प्रचंड कष्टदायी असून त्यामुळे मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढते. त्यातूनच ते कंटाळून शाळेचा नाद सोडतात.
अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ठाण्यातील सृजन चॅरिटेबल ट्रस्टने प्रयत्न सुरू केले होते. त्याच वेळी मुंबईतील वी-वंडर्स अ‍ॅण्ड एक्सप्लोरर आणि आकांक्षा गृप ही संस्थाही या मुलांसाठी सायकल देण्याचा उपक्रम राबवीत होते. त्यामुळे आता या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन  जास्तीत जास्त संख्येने मुलांना सायकल पुरवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांनी आपल्याकडच्या सायकली पाठविल्या. या सर्व सायकलींची देखभाल दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. अनेक नागरिकांनी नव्या सायकल खरेदी करून संस्थेकडे पाठवल्या आहेत. तर काहींनी सायकल खरेदीसाठी निधीची उपलब्धता करून दिली आहे. अजूनही सायकली जमा केल्या जात असून कुणाकडे सायकली असतील तर त्यांनी शुक्रवार ७ नोव्हेंबपर्यंत द्याव्यात, असे आवाहन सृजनच्या वतीने करण्यात आले आहे. रविवारी ९ नोव्हेंबर रोजी कोटेबी गावामध्ये या सायकलींचे वितरण होणार आहे, अशी माहिती सृजनचे सचिन देवकर यांनी दिली.
शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न..
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्याचा हा प्रयत्न असून अनेक छोटय़ा-मोठय़ा संस्थाही मदतीसाठी आल्या आहेत. विविध स्पर्धा घेऊन त्या माध्यमातून पारितोषिक म्हणून या सायकली विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे तेथील दोन विद्यार्थ्यांना सायकल दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यामुळे या विद्यार्थ्यांना तात्पुरती रोजगाराची संधी मिळू शकते. त्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठाही संस्थेच्या वतीने केला जाणार आहे, अशी माहिती वी-वंडर्स अ‍ॅण्ड एक्सप्लोरर संस्थेचे कमलेश गुर्जर यांनी दिली.