एकीकडे विद्यार्थी सेवेतील शिक्षक- प्राध्यापक मिळते त्यापेक्षा जास्त वेतन मिळावे म्हणून सरकारशी भांडत असताना दुसरीकडे डी.टी.एड. चे शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शासन नोकरीत सामावून घेतले जात नसल्याने शासनावर त्यांचा प्रचंड रोष आहे. आज मुंबई, नागपूर आणि गोंदियामध्ये डीटीएडधारकांनी तीव्र आंदोलन केले. डीटीएडधारक विद्यार्थी कृती समितीचे विदर्भ प्रमुख संकेत मंडलिक यांनी आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचा दावा केला आहे.
मुख्यत्वे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी प्रवेश चाचणी घेतली जाते. डीटीएडमध्ये अभ्यासक्रम पूर्ण झालेल्यावर सीईटी घेऊन शिक्षक भरती केली जाते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून एकाही शिक्षकाची जागा भरली गेली नाही. दरवर्षी राज्यात सुमारे १५ हजार प्राथमिक शिक्षक निवृत्त होतात. त्यानुषंगाने १५ हजार नवीन शिक्षकांची भरती होणे आवश्यक आहे. परंतु शासनाने गत तीन वर्षांपासून ४५ हजार जागा रिक्त ठेवल्या आहेत. हेच गाऱ्हाणे मांडण्यासाठी आज डीटीएड झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा आणला. त्यांना आकाशवाणी चौकात अडवण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विभागीय आयुक्त डॉ. वेणूगोपाल रेड्डी यांना निवेदन सादर करण्यात आले.
त्या शिक्षक भरतीसाठी दरवर्षी सीईटी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी करण्यात आली असून मागणी मान्य न केल्यास २०१४च्या निवडणुकांमध्ये डीटीएडधारक मतदानावर बहिष्कार टाकतील, असाही इशारा कृती समितीच्यावतीने देण्यात आला.
महाराष्ट्रातील खाजगी शाळांमधील शिक्षक भरतीमध्ये मोठय़ा प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक आवश्यक असताना शासनाने शिक्षकांची भरती थांबवली आहे.
खाजगी शाळेत प्रवेश परीक्षा घेऊन ताबडतोब शिक्षक भरती केली जाते तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये सीईटी घेतली जात नाही. खाजगी शाळांमध्ये १५ लाख रुपये भरून शिक्षक होतो तर जिल्हा परिषद शाळेत केवळ सीईटीच्या माध्यमातून शिक्षक होता येते, अशी माहिती कृती समितीचे जिल्हाध्यक्ष राकेश कैकाडे यांनी दिली. या आंदोलनाला सुमीत भिसेकर, सागर वाटकर, वैशाली आकरे, विनोद कडू, मुक्त बाभुळकर आदींचे सहकार्य लाभले.

“आम्ही त्यांच्याशी कुठलीही…”, नवाब मलिकांवरून महायुतीतल्या कथित मतभेदांनंतर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण; म्हणाले…