जिरायत शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने काय केले, असा प्रश्न उपस्थित करत माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकार संघटित वर्गापुढे झुकते मात्र असंघटित शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडते, नगर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह बनली आहे, तेथील शेतकरी वाचवा, किमान रोहयोच्या मजुरांना तरी पैसे वेळेवर द्या, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस पक्षाचे निरीक्षक उमाकांत गवळी यांच्या उपस्थितीत आज पक्ष कार्यालयात नगर तालुक्याची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी शेळके बोलत होते. गवळी यांनी दुष्काळी परिस्थिती व मागणांचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादर करण्याचे अश्वासन दिले. तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, भास्करराव डिक्कर, उबेद शेख, बाबासाहेब गुंजाळ, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, प्रताप शेळके, ज्ञानदेव गुंजाळ, दत्ता नारळे आदी उपस्थित होते.
राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील ८२ तालुक्यांसाठी स्वतंत्र बजेट करावे, अशी मागणी शेळके यांनी केली. पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, जुन्या पाझर तलावांची गळती थांबवणसाठी निधी द्यावा, ठिबकसाठी १०० टक्के अनुदान, फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करावे, अशा  मागण्या शेळके यांनी केल्या.
विशेष कार्यकारी अधिकारी, विविध समित्या, महामंडळावरील नियुक्तया रखडल्याने कार्यकर्त्यांचाही पक्षात दुष्काळ निर्माण झाला असल्याकडे उबेद शेख यांनी लक्ष वेधले. हराळ, डिक्कर, मंगला भुजबळ, अशोक त्रिभुवन आदींची भाषणे झाली.
 
तालुक्याला वंचित ठेवले
नगर तालुका सातत्याने दुष्काळी आहे, पूर्ण तालुक्यास कोठूनच पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे तालुक्यात जलसंधारणाच्या कामांसाठी स्वतंत्र पॅकेज द्यावे, अशी मागणी हराळ यांनी केली. त्यास माजी खासदार शेळके यांनी पाठिंबा दिला. दुष्काळामुळे पारनेर व संगमनेरला प्रत्येकी १० कोटी रुपयांचा निधी मिळाला, परंतु नगरला वंचित ठेवले, पॅकेज मिळण्याची मागणी पक्षाच्या मंत्र्यांकडे करणार असल्याचे हराळ यांनी सांगितले.