दहीहंडीची उंची, १२ वर्षांखालील मुलांना थरामध्ये केलेला मज्जाव आणि आयोजकांवर घातलेले र्निबध यावरून राज्य सरकार व गोविंदा पथकांमध्ये वाद सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या ‘चोर’ गाविंदाच्या माध्यमातून सरकारला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी पथके करीत आहेत. एका बाजूला न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी, तर दुसऱ्या बाजूला तमाम गोविंदा पथकांच्या भावनांचा उद्रेक, अशा दुहेरी परीक्षेचा सामना करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.
दरवर्षी नारळीपौर्णिमेचे औचित्य साधून मुंबईमध्ये सायंकाळी सात वाजल्यापासून चोर गोविंदा पथके आपापल्या परिसरातील मानाच्या दहीहंडय़ा फोडून, सलामी देत फिरत असतात. साधारण रात्री ११-१२ वाजेपर्यंत ही धामधूम सुरू असते. गेल्या काही वर्षांमध्ये चोर गोविंदाच्या निमित्ताने दहीहंडी बांधणाऱ्या आयोजकांची संख्याही वाढली आहे.यंदा दहीहंडीची उंची २० फूट असावी, दहीहंडीच्या खाली गाद्या पांघराव्यात, थरातील गोविंदांना सुरक्षेची उपकरणे द्यावीत, ध्वनिक्षेपकांचाोवाज मर्यादेत ठेवावा, १२ ते १५ वर्षे वयोगटांतील मुलांच्या पालकांचे परवानगी पत्र पाहून त्यांना थरात उभे राहण्यास परवानगी द्यावी, अशा अनेक अटी आयोजकांवर घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे आयोजकांनी उत्सवातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. तर र्निबधांचा फेरविचार न केल्यास उत्सव साजरा करणार नाही, असा इशारा दहीहंडी समन्वय समितीने दिल्यामुळे मतपेढीवर डोळा ठेवून असलेल्या राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे.गोकुळाष्टमीच्या दिवशी उत्सव साजरा करणार नाही, असा इशारा समन्वय समितीने दिला असला तरी नारळी पौर्णिमेच्या दिवशी धूमधडाक्यात गोविंदा पथक काढण्याची तयारी काही पथके करीत आहेत. कुलाबा, गिरगाव, लालबाग, परळसह उपनगरांमधील काही आयोजक या पथकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. या आयोजकांनी दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा पथकांना आमंत्रित केले आहे. या संदर्भात काही गोविंदा पथकांच्या प्रशिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी आयोजकांच्या नियमानुसार दहीहंडी फोडण्याचा मानस व्यक्त केला. तर काहींनी राज्य सरकारचे र्निबध जुगारून दहीहंडी फोडण्याची तयारी दर्शविली. आता महिला गोविंदा पथकांनीही या र्निबधांविरुद्ध कंबर कसली आहे. यापूर्वी अभावानेच महिला पथके चोर गोविंदामध्ये सहभागी होत होत्या. मात्र यावर्षी बहुतांश महिला पथके नारळी पौर्णिमेच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी बाहेर पडणार आहेत. यंदा सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर नारळी पौर्णिमेला निघणारा ‘चोर’ गोविंदा पोलिसांसाठी परीक्षेचा ठरणार आहे.