गोलपीठा, पीला हाऊस, फोरास रोड आदी परिसरात त्यावेळी मुजरे चालायचे. परंतु या ठिकाणी उच्चभ्रूंना जायला लाज वाटत असे. मुजरे कसले ते? फिल्मीगीतांवरील तो नाचच असायचा. मात्र पोलिसांना चुकवत आणि समाजात आपली प्रतिष्ठा मिरवित जाणाऱ्या उच्चभ्रूंना आणखी काही पर्याय हवा होता. बारमालकांनी, अड्डेचालकांनी ‘डान्स स्कूल’ ही संकल्पना काढली. ताडदेवच्या एसी मार्केटमधील इमारतीत त्यावेळी तब्बल २५ हून अधिक डान्स स्कूल सुरू झाल्या. डान्स स्कूलच्या नावाखाली उघड शरीरविक्रयाचा धंदा चालत होता. ते काहींच्या नजरेत आले. त्यामुळे एका रात्रीत त्यावरही बंदी आली. चित्रपटांतून त्यावेळी मुंबईत डिस्कोचे पेव फुटले होते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमोर ‘बुलक कार्ट’ या नावे पहिला डिस्को सुरू झाला. दिवसा कॉलेजातील तरुण-तरुणींचा राबता असायचा आणि रात्री.. शरीरविक्रय करणाऱ्या ललनांचा.. सीझर पॅलेस, मयुर पॅलेस, हेल आदी  एकापेक्षा एक डिस्को सुरू झाले. परंतु त्याचवेळी बोकाळलेल्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांसाठी या जागा मिटिंग प्लेसे बनू लागल्या. डिस्को क्लब ‘पिकअप जॉइंट’ होऊ लागले तशी ओरड सुरू झाली. भरपूर हप्ते मिळवून देणाऱ्या या क्लबविरुद्ध पोलिसांना कारवाई करावी लागली. आज डिस्को थेकची जागा पबनी घेतली आहे.
डिस्को थेकवर अघोषित बंदी आल्यानंतर बारवाल्यांनी लेडीज सव्‍‌र्हिस बार सुरू केले. परंतु लेडीज ‘सव्‍‌र्हिस’ऐवजी इतर ‘सव्‍‌र्हिस’चीच जास्त चर्चा झाली. लेडिज सव्‍‌र्हिसवरही पोलिसांची वक्रदृष्टी वळल्याने मसाज पार्लर वाढू लागले. परंतु याकडेही छुप्या गिऱ्हाईकाव्यतिरिक्त फारसे कुणी येत नव्हते. मद्यपानाचा आस्वाद घेता घेता गाणी ऐकणाऱ्या शौकिनांसाठी ऑर्केस्ट्रा बार सुरू झाले. या ऑर्केस्ट्रादरम्यान एखाद्या गाण्यावर ‘आयटम साँग’ होऊ लागले. गाण्यांपेक्षा या ‘साँग’ना अधिक प्रतिसाद मिळू लागला. पोलिसांनीही ऑर्केस्ट्राबरोबर ‘क्लासिकल डान्स’ची परवानगी देण्यास सुरुवात केली. ‘क्लासिकल डान्स’सोबत रेकॉर्डेड म्युझिकवर डान्स असा परवाना मिळू लागला आणि मुंबईत डान्सबारचे पेव फुटले. सुरुवातीला ग्रँट रोडच्या ‘सोनी’ज् वा भायखळ्याच्या ‘कॅफेरिओ’नंतर नॉव्हेल्टी टॉकिजवळच्या ‘टोपाझ’ बारने सगळी समीकरणेच बदलून टाकली. एकापेक्षा एक सुंदर नर्तिकांनी आपली अदा दाखविण्यास सुरुवात केली. पैशाची बरसात होऊ लागली आणि मुंबईतील ‘डान्स बार’ हे पर्यटकांचे आकर्षण ठरले. मुंबईत आल्यानंतर डान्सबारला भेट दिल्याशिवाय पर्यटन पुरे होत नाही, असे गाईड सांगू लागले. राज्य सरकारने बंदी घातली तेव्हा मुंबई, ठाणे व नवी मुंबईत तब्बल सहाशे डान्सबारनी तोपर्यंत आपले पाय पसरविले होते आणि बंदी आल्यानंतर यापैकी अनेक फॅमिली रेस्तराँ झाली. काही बंदी उठण्याची वाट पाहत दिवस ढकलू लागले.. बंदी उठल्याचा आदेश आला अन् या सर्वाचेच चेहरे उजळले..

करोडपती नर्तिका..
* अंधेरी पश्चिमेतल्या सात बंगला परिसरात बंगला, आलिशान गाडी आणि एक कोटी रुपयांची रोकड सापडली अन् तरन्नूम ही बारनर्तिका एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली. त्याचवेळी बारमधल्या करोडपती नर्तिकांची चर्चाही सुरू झाली. विलेपार्ले येथील दीपा बारमध्ये अशा तरन्नूम अनेक होत्या. पैशांचा पाऊस काय असतो, हे दीपा बारमध्ये हमखाल दिसायचे. मर्सिडीज, बीएमडब्ल्यूच्या डीकीतून पैशाच्या पेटय़ा आणल्या जात होत्याच.. पणच अशाच आलिशान गाडीतून नर्तिका खाली उतरत होत्या. आवाक्याबाहेरचे महागडे मोबाईल या नर्तिकांकडे दोन-तीन असायचे. प्रत्येक क्लाएंटसाठी वेगवेगळा क्रमांक. रात्रभर नृत्याची अदा दाखवून पैशाच्या पेटय़ा घेऊन जात होत्या..  पहाटेपर्यंत नृत्याचा धिंगाणा सुरू असला तरी बाहेर आवाजही येत नव्हता. किंबहुना पहाटेपर्यंत बार सुरू असल्याच्या तक्रारी आल्या तरी पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते. तरन्नूमचे खरे नाव तरन्नूम कधीच नव्हते. टोपण नावे घेत या बारनर्तिकांनी लाखो रुपयांची माया आपल्या केवळ अदांवर गोळा केली होती. काही पोलीस अधिकारीही या नर्तिकांवर फिदा होते. ‘चकमक’फेम अधिकाऱ्यांचेही हे अड्डे होते.
ल्ल करोडपती नर्तिकांसाठी वरळीचा ‘कार्निवल’, ग्रँट रोडचा ‘टोपाझ’ मांटुग्याचा ‘तंदूर’, अंधेरीचा ‘नाईट लव्हर’, चेंबूरचा ‘लक्ष्मी पंजाब’ घाटकोपरचा ‘नटराज’ वा बोरिवलीतला ‘चार्वाक’ आदींची हमखास नावे घेतली जायची.
*‘डान्सबार्स’नी मालकांना कुठल्या कुठे नेऊन पोहोचविले. अनेक बारमालक आज बिल्डर म्हणून मिरवताहेत. यापैकी एका बारमालकाने तर मराठी न्यूज चॅनेल सुरू केले. काही पोलीस अधिकारीही बारमालक झाले. चकमकफेम अधिकाऱ्यांची डान्सबारमध्ये भागीदारी असल्याचे सांगितले जाते.
पोलीसही आनंदी..
डान्सबारवरील बंदी उठल्याचा पोलिसांनाही आनंद झाला आहे. बंदी असल्यामुळे दररोज न चुकता डान्स बार तपासायचे. रात्री-अपरात्री नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली की, पळत सुटायचे, अशी पोलिसांची अवस्था झाली आहे. त्यातच एखादा बार उघडा मिळाला की, निलंबनाची भीती. आता अधिकृतपणे डान्सबार सुरू होतील. आमचेही हप्ते वाढतील. अनेक छोटय़ा-मोठय़ा कामांसाठी आम्हाला हे बारवाले हमखास मदत करायचे. तेही पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया काही पोलिसांनी व्यक्त केली.