उच्चशिक्षित असूनही वेठबिगारासारखे कमी वेतनावर राबवून घेत असल्याने आंदोलनात उतरलेल्या उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या ३३ डाटा ऑपरेटर्सना आपली नोकरी गमावण्याची भीती वाटू लागली आहे. एजन्सीने नवी कामगार भरती सुरू केल्याने संपावर गेलेल्या कामगारांना कामावरून टाकतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी आंदोलनकर्त्यांनी उरणमधील कामगार व सामाजिक क्षेत्रांतील नेत्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. अनेक खासगी कंपन्यांत कायदे धाब्यावर बसवून मालकांकडून संप पुकारणाऱ्या कामगारांना कामावरून कमी करण्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये खासगी एजन्सीमार्फत नेमण्यात आलेल्या या डाटा ऑपरेटर्सवरही अशी वेळ येण्याची शक्यता असल्याचे येथील प्रशासकीय अधिकाऱ्यानेच सूचित केले आहे. त्यामुळे या कामगारांच्या मागे स्थानिक कामगार नेत्यांनी उभे राहावे व त्यांना त्यांच्या हक्काचे ठरल्यानुसार वेतन मिळवून देण्यासाठी मदत करावी, असे आवाहन या डाटा ऑपरेटर्सकडून करण्यात आले आहे. लढय़ासाठी प्रसिद्ध असलेल्या उरण तालुक्यातील कामगार व सामाजिक क्षेत्रांतून आम्हाला पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला आहे.