वाफेवर चालणाऱ्या इंजिनापासून ते अगदी विद्युत इंजिनापर्यंत रेल्वेच्या स्थित्यंतराचे साक्षीदार असणारे आणि तब्बल एक तप डेक्कन क्वीनसारख्या प्रतिष्ठेच्या गाडीचे सारथ्य करणारे सत्यवान नितनवरे हे इंजिन चालक येत्या १ मेपासून रेल्वेतून निवृत्त होत आहेत. रविवारी सकाळी पुण्याहून मुंबईकडे येणारी डेक्कन क्वीन त्यांनी मुंबईकडे आणली आणि या ‘राणी’चे सारथ्य पुढील पिढीकडे सोपवले. या फेरीनंतर आपण इंजिनमध्ये नाही, तर मागच्या डब्यांमध्ये बसून ‘खंडाळ्याचो घाट’ दिसतो कसा ते पाहणार आहोत, असे नितनवरे यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
इंग्रजांच्या आमदनीत सुरू झालेल्या आणि अजूनही आपला आब राखून असलेल्या मोजक्या गाडय़ांपैकी एक गाडी म्हणजे ‘डेक्कन क्वीन’! निळ्या-पांढऱ्या रंगाची ही गाडी खंडाळ्याच्या घाटातून जाताना पाहिली की, डोळ्यांचे पारणे फिटते. पुणेकरांना तर या गाडीचे एवढे कौतुक की, ही गाडी पुण्याहून सकाळी सुटताना आधी सनई-चौघडा वगैरे वाजायचा. या गाडीचे सारथ्य करणे, ही रेल्वेच्या सेवेत एक मानाची गोष्ट मानली जाते. सत्यवान नितनवरे यांना गेली १२ वर्षे सातत्याने हा मान मिळाला.
तब्बल ३९ वर्षांपूर्वी रेल्वेच्या सेवेत रुजू झालेल्या नितनवरे यांनी आतापर्यंत कोळशाच्या इंजिनापासून डिझेल इंजिन आणि आता विद्युत शक्तीवर धावणारे इंजिन अशी सर्व प्रकारची इंजिने ‘हाकली’ आहेत. डेक्कन क्वीनसारखी मानाची गाडी पहिल्यांदा चालवताना अंगावर रोमांच उभे राहिले होते. तोपर्यंत खंडाळ्याच्या घाटातून अनेक गाडय़ा नेल्या होत्या, पण डेक्कन क्वीनचा डौल काही औरच आहे. या गाडीचे प्रवासीही खूपच प्रेमळ आणि गाडीवर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे डेक्कन क्वीनचा चालक होणे, ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची आहे, असे नितनवरे सांगतात.
रविवारी नितनवरे यांनी पुण्याहून ही गाडी मुंबईकडे आणली. गाडी मुंबईच्या प्लॅटफॉर्मला लागल्यानंतर नितनवरे यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी त्यांचे फुलांच्या गुच्छांनी स्वागत केले. या गाडीचे इंजिन नितनवरे यांच्यासाठी खास सजवण्यात आले होते. नितनवरे यांच्यासाठी खास केक तयार करण्यात आला होता. या केकवर वाफेवरच्या इंजिनापासून ते विद्युत इंजिनापर्यंतची इंजिने तयार केली होती. या सोहळ्यासाठी नितनवरे यांच्या पत्नीलाही आमंत्रित करण्यात आले होते.
खंडाळ्याचा घाट मनसोक्त बघायचाय
-सत्यवान नितनवरे
हा सर्वच सोहळा आपल्यासाठी खूपच भावुक होता. अशा प्रकारे निवृत्त होणे, हे माझे भाग्य आहे. मला भटकंती करायला आवडते. आता मी मनसोक्त भटकणार आहे. आतापर्यंत मी खंडाळ्याचा घाट नीट डोळे भरून पाहिलाच नाही. सर्व लक्ष इंजिनाकडेच असायचे. मात्र आता इंजिनामागच्या डब्यांमध्ये बसून हा घाट मनसोक्त बघणार आहे.