ध्वनिप्रदूषणाविरोधात गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या प्रबोधनात्मक चळवळीकडे कानाडोळा करीत ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे.
ठाणे शहरात रात्री नऊ ते बारादरम्यान विविध ठिकाणी मिरवणुकांमधील आवाजांचे मापन करण्यात आले. पोलीस विभागाने सक्त मनाई करूनही विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठय़ा प्रमाणात डीजेंचा वापर झाला. त्याचप्रमाणे पारंपरिक ढोल आणि ताशेही ध्वनिप्रदूषण करण्यात आघाडीवर होते. स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात ६० टक्के मंडळांच्या मिरवणुकांमध्ये डीजे, तर उर्वरितांनी पारंपरिक वाद्यांचा वापर केल्याचे आढळून आले. काही मंडळांनी डीजे तसेच ढोल दोन्ही एकाच वेळी वाजवून आवाजाचा अतिरेक केला. पाच-सहा खासगी रुग्णालये असणाऱ्या गोखले रोडवर आवाजाची पातळी ८० ते १०५ डेसिबल्स इतकी होती. वाहतुकीचे नियमन करण्यासाठी शहरात मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. मात्र त्यापैकी कुणीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना आवाजाची पातळी कमी करण्याविषयी तंबी देताना दिसत नव्हते, असेही सर्वेक्षणात आढळून आल्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी कळविले आहे. मंगलमूर्तीच्या या विसर्जन  मिरवणुकांमध्ये सर्रास हिंदी चित्रपट संगीतातील उथळ गाणी वाजवली गेली. त्यात अश्लील गाण्यांचाही समावेश होता.  ठाण्याप्रमाणे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आदी ठिकाणच्या विसर्जन मिरवणुकांमधील आवाजानेही अवाजवी पातळी ओलांडल्याचे दिसून आले.        

‘अविवेकी आवाजाचे मोजमाप’
गोखले रोड              रात्री ९         ९० डेसिबल्स
गोखले रोड             रात्री ११        १०५ डेसिबल्स
राम मारुती रोड       रात्री ९.३०      ९५ डेसिबल्स
राम मारूती रोड       रात्री १०.३०   १०० डेसिबल्स
तीन हात नाका         रात्री ९.१५      ८५ डेसिबल्स
कळवा चौक             रात्री १०        ९० डेसिबल्स
वर्तकनगर              रात्री ९.२५      ८५ डेसिबल्स
उपवन तलाव            रात्री ९.३५    १०० डेसिबल्स
तलावपाळी               रात्री ११     १०० डेसिबल्स
तलावपाळी              रात्री ११.३०   १०५ डेसिबल्स
तलावपाळी               रात्री १२       १०० डेसिबल्स