कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आपले ध्येय निश्चित करणे, मन एकाग्र करून त्यादृष्टीने वाटचाल करणे आवश्यक असल्याचा मंत्र ‘सिडको’चे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मुरबाड येथील शिवळे विभागीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला.
मुरबाड तालुक्यातील ‘जनसेवा शिक्षण संस्थे’च्या शिवळे विभागीय विद्यालयात ‘लोकसत्ता’तर्फे काढण्यात येणाऱ्या ‘यशस्वी भव!’ पुस्तकाचे वाटप हिंदुराव यांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी जनसेवा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार गोटीराम पवार यांच्यासह परिसरातील शाळांमधील पाचशेहून अधिक विद्यार्थी, शाळांचे मुख्याध्यपक उपस्थित होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांचा प्रत्येक क्षण अनमोल असून दहावीतील यश ही यशस्वी जीवनाची पहिली पायरी आहे. सरकारने सर्वाना शिक्षणाचा हक्क दिला आहे. पण त्याचा उपयोग करण्याची मानसिकता ग्रामीण भागात निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक सोयी करणे गरजेचे आहे, असे हिंदुराव यांनी नमूद केले.
‘लोकसत्ता’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे साह्य नेहमीच करण्यात येईल. यापुढे केवळ मुरबाड तालुकाच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा शंभर टक्के साक्षर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी शिकला तर समाजाची प्रगती होईल. त्याअनुषंगाने देशाची प्रगती होईल. नेल्सन मंडेला यांनी प्रतिकूल परिस्थितीशी झगडत लढा दिला. अखेर त्यांच्या संघर्षांला यश आले. सचिन तेंडुलकरने क्रिकेट खेळताना जी एकाग्रता दाखवली तशीच एकाग्रता विद्यार्थ्यांनी अभ्यासात दाखवावी, असे सांगत हिंदुराव यांनी ‘यशस्वी भव!’सारखा उपक्रम ग्रामीण भागातही राबवण्यात सहकार्य दिल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे त्यांनी आभार मानले.
शिवळे विभागीय हायस्कूलचे मुख्याध्यापक हरड सर, प्रा. प्रकाश पवार यांनी विशेष सहकार्य केले. मगर सर यांनी भूमितीबाबत तर सुप्रिया अभ्यंकर यांनी विज्ञान विषयाचे मार्गदर्शन केले. हिंदुराव यांच्या सहकार्याने मुरबाड तालुका व कल्याण ग्रामीण भागातील २३ शाळांमधील अडीच हजार विद्यार्थ्यांना ‘यशस्वी भव!’ पुस्तके मोफत देण्यात आली आहेत. ‘लोकसत्ता’तर्फे अजयकुमार चुघ, विराज काळसेकर, समीर म्हात्रे, सुरेश ठाकूर, अनंत वाकचौरे, योगेश मोरे उपस्थित होते.