सहकारमहर्षी किसनराव वराळ पतसंस्थेतील अपहारप्रकरणी संचालक मंडळाच्या अटकपूर्व जामिनाचा फैसला गुरुवारी होणार आहे. संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाल्यानंतर सर्वांनीच अटकपूर्व जामिनासाठी नगरच्या सत्र न्यायालयात अर्ज केले होते. या अर्जावर न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मागविले. पारनेरचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी आपले म्हणणे सरकारी वकिलांकडे सादर केले असून गुरुवारी ते न्यायालयापुढे मांडण्यात येणार आहे.
आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्यानंतर दि. २८ नोहेंबरपर्यंत पोलिसांना त्यांचे मत कळविण्याचे आदेश न्ययालयाने दिले होते. परंतु न्यायालयाचा हा आदेश तोपर्यंत पारनेर पोलिसाना मिळालाच नव्हता. त्यामुळे या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांनी नगरच्या सरकारी वकिलांकडे आपले म्हणणे सादर केले. सरकारी वकिलांकडून वेळेत बाजू न मांडली गेल्याने न्यायालयाने आता याप्रकरणावर दि. ५ ला पोलिसांचे मत मांडण्याचे आदेश दिले.
मुंबई उच्च न्ययालयाच्या आदेशानुसार संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून  या संस्थेत सुमारे ८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. या संस्थेकडे गोरगरीब ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. संस्थेने इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम केले असून कर्जामध्येही बेकायदेशीररीत्या सूट देण्यात आलेली आहे. या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करणे गरजेचे असल्याने न्यायालयाने सर्व आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळावेत. संचालक मंडळात वजनदार व्यक्ती असून त्यांना जामीन दिल्यास चौकशीस ब्रेक लागेल असे म्हणणे ढोकले यांनी सादर केले आहे. पोलिसांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालय आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय घेणार असल्याचे वकील तांदळे यांनी सांगितले.