उन्हाळयात जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यप्राणी तहान भागविण्यासाठी जंगलातून बाहेर पडतात आणि मानव-वन्यजीव संघर्षांची परिस्थिती अधिक बिकट होते. हे टाळण्यासाठी गेल्या काही वर्षांत अनेक स्वयंसेवी संस्था जंगलालगत कृत्रिम पाणवठे तयार करण्यापासून तर उपलब्ध पाणवठय़ावर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, शनिवारी काही विद्यार्थ्यांनी नैसर्गिक आपत्ती ओढवूनसुद्धा, त्यावर मात करीत एक नव्हे तर दोन बंधारे बांधून एक नवा आदर्श घालून दिला.
एरवी तरुणाईच्या नावाने नुसती ओरड केली जाते, पण हीच तरुणाई एकत्र आल्यानंतर अपेक्षेहूनही चांगले कार्य करू शकते हे नागपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कळमेश्वर वन परिक्षेत्रात दिसून आले. जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या सुमारे ५७ विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दोन बंधारे बांधले. या वन परिक्षेत्रात वाघापासून तर रानकुत्रे आणि इतर वन्यजीवांचे चांगले वास्तव्य आहे. या परिसरात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत मोठय़ा प्रमाणावर असले तरीही वाळूच्या अती प्रमाणामुळे ते बुजल्यात जमा आहेत. श्रमदानातून हे नैसर्गिक स्त्रोत पुन्हा जिवंत होऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर, मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते व वन्यजीवप्रेमी विनित अरोरा यांनी विद्यार्थ्यांना साद घातली. जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सच्या प्रा. रश्मी अरोरा, प्रा. माधुरी पुरोहीत, प्रा. आशुतोष तिवारी व प्रा. पल्लवी श्रीवास्तव यांनी त्यांच्या या उपक्रमाला होकार दिला.
कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील खरी नर्सरीलगतच्या परिसरात बंधारा बांधण्याचे निश्चित झाल्यानंतर सकाळीच विद्यार्थी तिकडे रवाना झाले. नाल्यात साठलेली रेती काढून त्या रेतीच्याच सहाय्याने त्यांनी बंधारा बांधण्यास सुरुवात केली. त्याचवेळी बंधाऱ्याचा एक थर राहिला असताना निसर्गाच्या नियमाविरुद्ध गेल्यास काय परिस्थिती ओढवू शकते याचा प्रत्ययसुद्धा या विद्यार्थ्यांनी घेतला. मात्र, त्यावर मात करीत त्यांनी एका बंधाऱ्याचे उद्दिष्ट तर पूर्ण केले, पण त्याचवेळी दुसरा बंधारासुद्धा त्यांनी बांधला. त्यामुळे उन्हाळयात या परिसरातील वन्यप्राण्यांना इतरत्र भटकण्याची वेळ येणार नाही.
याप्रसंगी नागपूर वन विभागाचे उपवनसंरक्षक पी.के. महाजन, कळमेश्वरचे वनपरिक्षेत्रद्ध अधिकारी एम. मोहीते, सृष्टी पर्यावरण मंडळाचे संजय देशपांडे, प्रतीक दाडे, लक्ष्मीकांत अहीरकर व इतर वनरक्षक उपस्थित होते.



