शहरातील बेशिस्त अॅपे रिक्षा व बेकायदेशीर रिक्षांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शहर रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. या मागणीकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी दिला आहे.
संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रिक्षाचालक व मालकांच्या मेळाव्यात घुले बोलत होते. आरटीओ अधिकारी भोसले, अभिजित कराळे, राहुल बळे, जिल्हा रिक्षा पंचायतीचे उपाध्यक्ष विलास कराळे, उस्मान पठाण आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी घुले म्हणाले, परवानाधारक रिक्षाचालक व मालक सर्व सरकारी नियमांचे काटेकोर पालन करून हा व्यवसाय करतात. परवाना शुल्कासह विविध करही नियमितपणे भरतात. मात्र शहरात अलीकडे अॅपे रिक्षांचा सुळसुळाट झाला असून हे तसेच अनधिकृतरीत्या रिक्षा चालवणाऱ्यांकडून सर्व नियम सर्रास पायदळी तुडवले जात आहेत. ते प्रामुख्याने अवैधरीत्याच प्रवासी वाहतूक करतात. संघटनेने वारंवार मागणी करूनही त्यांच्यावर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही. आरटीओ कार्यालय, पोलिसांची वाहतूक शाखा या संबंधित यंत्रणांनी त्याकडे सातत्याने दुर्लक्षच केले आहे. या बेकायदेशीर रिक्षांमुळे केवळ परवानाधारक रिक्षाचालकांचेच नुकसान होते असे नाही तर, शहराच्या रहदारीतही कमालीची बेशिस्त आली आहे. या सगळय़ा गोष्टी लक्षात घेऊन अॅपे रिक्षा व अनधिकृत रिक्षाचालक-मालकांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी घुले यांनी केली आहे.
शहरात पाच ते सहा हजार अनधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत असल्याची माहिती कराळे यांनी या वेळी दिली. ते म्हणाले, परवानाधारक रिक्षाचालक कर्ज उभारून नियमानुसार व्यवसाय करतो, मात्र अनधिकृत रिक्षाचालकांचा भरुदड त्यांनाच सहन करावा लागतो. हे तातडीने न थांबल्यास परवानाधारक रिक्षाचालक रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला. ज्ञानेश्वर थोरात यंनी आभार मानले.
मीटरप्रमाणे भाडे आकारणीस तयारी
शहरातील रिक्षाचालक गेली वर्षांनुवर्षे मीटर वापरत नाहीत. परवानाधारक रिक्षाचालक व मालकांची त्याला तयारी आहे. मध्यंतरी आरटीओ कार्यालयाच्या आदेशानुसार मीटर बसवण्यात आलेही होते. मात्र अनधिकृत रिक्षाचालकांमुळेच त्यात यश आले नाही. परवानाधारक रिक्षाचालकांची मीटरप्रमाणे भाडेआकारणी करण्यास अजूनही तयारी असल्याचे या मेळाव्यात सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2013 रोजी प्रकाशित
अनधिकृत रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी
शहरातील बेशिस्त अॅपे रिक्षा व बेकायदेशीर रिक्षांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शहर रिक्षा चालक-मालक संघटनेने केली आहे. या मागणीकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी दिला आहे.
First published on: 04-09-2013 at 01:40 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for action on illigal rikshaw driver