महापालिकेच्या जुन्या इमारतीसमोरच्या बेग पटांगणाची जागा यतीमखान संस्थेस द्यावी, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या वतीने आयुक्त विजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली. पुरातत्व खात्याच्या जाचक नियमांमुळे या जागेवर बांधकाम करणे मनपालाच अशक्य झाले आहे.
नगरसेवक अरिफ शेख, हाजी नजीर शेख, समदखान, तसेच उद्योजक करीमशेठ हुंडेकरी, रफिक शेख, उबेद शेख, फारूख रंगरेज, कादर खलिफा, शेख कासम आदींनी आयुक्त कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांना बेग पटांगणाची मागणी करणारे निवेदन दिले. यतीमखाना संस्थेच्या जवळच ही जागा आहे. संस्थेत सध्या ५०० अनाथ मुले आहेत. त्यांना सध्याची जागा अपुरी पडत आहे. बेग पटांगणाची जागा मिळाल्यास त्यावर संस्थेला इमारत बांधून या मुलांची व्यवस्था लावणे शक्य होईल. त्यामुळे ही जागा संस्थेला द्यावी, त्याबाबत ज्या काही सरकारी अडचणी येतील त्या संस्था सक्षमपणे दूर करेल, असे निवेदनात म्हटले आहे. मनपाच्या वतीने यापूर्वी आनंदॠषी रुग्णालय, स्नेहालय, जनकल्याण रक्तपेढी अशा संस्थांना याप्रमाणे जागा देण्यात आली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पटांगणाची ही जागा तत्कालीन नगरपालिकेने थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढून ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. नंतर मनपानेच त्यावर मोठे व्यापारी संकुल बांधण्याचा विचार केला होता. तो बारगळल्यावर त्यावर टपरी मार्केट सुरू करण्यात येणार होते. बरोबर या जागेसमोरच पुरातत्व खात्याकडे नोंद असणारी एक जुनी कमान आहे. जुन्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरात नवे बांधकाम करण्याबाबत पुरातत्व खात्याने अत्यंत कडक नियम केले आहेत. त्यामुळेच मनपाला या जागेवर काहीही करणे अशक्य झाले आहे. त्यातूनच मनपाचे जागेकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असून वाळू ठेकेदार, तसेच अन्य काहीजणांनी या जागेचा ताबा घेतला आहे. आता यतीमखाना संस्थेसाठी मुस्लीम समाजातील मान्यवरांनी या जागेची मागणी केल्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.