उसाला पहिली उचल २ हजार १०० रुपये, तसेच २ हजार ८०० रुपये भाव दिल्याशिवाय उसाचे टिपरूही उचलू दिले जाणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे शेट्टी यांची जाहीर सभा झाली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर, रावसाहेब आडकिणे, बेगाजीराव गावंडे आदींची उपस्थिती होती. अशोकराव चव्हाण यांनी केवळ एक वर्षांसाठी कारखाना चालविण्यास माझ्याकडे द्यावा. आहे त्या यंत्रणेत कोणताच बदल न करता केवळ निर्णय घेण्याचा अधिकार मला द्यावा. शेतकऱ्याला उसाचा भाव कसा देता येतो, हे मी सिद्ध करून दाखवतो, असे आव्हान शेट्टी यांनी या वेळी दिले. डोंगरकडा साखर कारखान्याकडे ४०० एकर जमीन आहे. हा कारखाना १५ कोटी ८८ लाखांत विकत घेतला. राज्यातील ज्या काही सहकारी साखर कारखान्यांची विक्री झाली आहे, त्याची चौकशी झालीच पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथे ९ ऑक्टोबरला मोर्चा काढला जाणार आहे, असेही ते म्हणाले.
ऊसभावाविषयी शेट्टी यांनी सांगितले, की एक टन उसापासून १.२० क्विंटल साखर तयार होते. या तयार होणाऱ्या साखरेची बाजारात ३ हजार ६०० रुपये किंमत होते. मळीचे उत्पन्न २५० रुपये, तर दारूसाठी वापरल्या जाणाऱ्या मळीचे ७ हजार ५०० रुपये मिळतात. हे आकडे लक्षात घेता कारखान्याला ४ हजार ६०० रुपये मिळतात. त्यावर प्रक्रिया खर्च १ हजार १०० रुपये वगळता कारखान्याला निव्वळ नफा ३ हजार ५०० रुपये मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी २ हजारांचा भाव का घ्यावा, असा सवाल त्यांनी केला.
या कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात आली. कारखान्यात शेतकऱ्यांचे पैसे गुंतले असल्याने कार्यक्षेत्रातील मूळ ऊसउत्पादक सभासदांना कारखान्याचे सभासद करून घ्यावे, या साठी आपले प्रयत्न राहतील. त्यासाठी शेतकऱ्यांची साथ हवी, असेही त्यांनी सांगितले.