टेंबलाईवाडी येथील महापालिकेच्या जागेमध्ये आयआरबी कंपनीने पोटकूळ असलेल्या आयर्न हॉस्पिटिलीटी या कंपनीला हॉटेल बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. परंतु या जागेला तात्पुरती बिगरशेती अशी मंजुरी असून जोपर्यंत अंतिम बिगरशेतीसाठीची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत बांधकाम थांबवावे, असे आदेश आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिले. त्याबाबतची नोटीस लगेचच लागू करावी, अशी सूचना नगररचना विभागाचे सहायक संचालक एम.डी.राठोड यांना दिली. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने हॉटेलच्या बांधकामामुळे या ठिकाणच्या नाल्याचे पात्र बदलले असून या हॉटेलचे बांधकाम महापालिकेने पाडून टाकण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.     
या वेळी दिलीप देसाई यांनी कोणतीही जमीन बिगरशेती झाल्याशिवाय बांधकाम परवानगी देता येत नसल्याचे स्पष्ट केले. आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे अधिकार नगररचनाचे सहायक संचालक राठोड यांनी वापरले असल्याचा आरोप यावेळी केला. ज्या ठिकाणी हॉटेलचे बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणचा नाला मुजविण्यात आला आहे. त्यामुळे आयआरबी व संबंधित कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली.     
निवास साळोखे म्हणाले, राठोड यांनी परस्पर परवानगी दिली असून हा आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचा अवमान आहे. त्यामुळे राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांची चौकशी करण्याची मागणीत्यांनी केली.     
आयुक्त बिदरी यांनी जमीनीला बिगरशेतीची परवानगी नसताना तुम्ही परवानगी कशी काय दिली ? असा जाब राठोड यांना विचारला. त्याचबरोबर येथून पुढे शहरातील कोणत्याही ठिकाणच्या बांधकामास परवानगी देताना बिगरशेती आहे किंवा नाही हे तपासूनच द्यावी असे सांगितले. आयआरबी व आर्किटेक्ट यांना नोटीस पाठवून हॉटेलचे बांधकाम तातडीने थांबविण्याबाबतचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. तसेच उपायुक्त यांच्यासह महापालिकेतील इतर अधिकाऱ्यांबरोबर व टोलविरोधी कृती समितीच्या सदस्यांबरोबर पाहणी करून नाल्याचे पात्र बदलले आहे की नाही याची खात्री करण्याच्या निर्णयही या वेळी घेण्यात आला.
बैठकीस रामभाऊ चव्हाण, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, भगवान काटे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर,बाबा महाडिक, दीपा पाटील, अनिल घाटगे, अशोक पोवार यांच्यासह टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.