वकिलांविरुद्ध दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे रद्द करावेत, अशी मागणी नगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना निवदेन देऊन केली. खोटे गुन्हे दाखल झाल्यास यापुढे वकील संघटना जशास तसे उत्तर देईल, असा इशाराही संघटनेचे अध्यक्ष शिवाजी कराळे यांनी दिला.
काही पक्षकार वकिलांनी फी मागितली म्हणून जाणूनबुजून वकिलांविरुद्ध खोटय़ा तक्रारी करतात, वकीलपत्र घेतल्याच्या रागातूनही तक्रारी केल्या जातात, पोलीसही त्याची शहानिशा न करताच गुन्हे दाखल करतात, त्यामुळे वकिलांची विनाकारण बदनामी होते, त्यांना काम करणेही अवघड झाले आहे, वकिलाकडून खरेच गुन्हा घडला तर संघटना त्याचे समर्थन करणार नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अ‍ॅड. निर्मला चौधरी व अ‍ॅड. राजेंद्र टाक यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याकडे संघटनेने शिंदे यांचे लक्ष वेधले.
वकिलांनी जर चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन खतपाणी घातले नाहीतर अशा घटना घडणार नाही, त्यासाठी संघटनेने वकिलांचे प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी या वेळी केले. वकिलांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्य़ांबाबत आपण चौकशी करू, असे आश्वासनही शिंदे यांनी दिले. संघटनेचे पदाधिकारी राहुल पवार, युवराज पाटील, मंगेश दिवाणे, शशिकांत रक्ताटे, श्रीकांत गवळी, योगेश दहातोंडे, विनायक दारुणकर, अभिजित लहारे, अशोक गदादे, प्रकाश हिवाळे, अशोक पालवे आदी उपस्थित होते. संघटनेच्या शिष्टमंडळाने तोफखाना पोलिसांनाही निवेदन दिले.