मुंबईतही अनेक वस्त्यांमध्ये कुपोषित तसेच अपंग मुलांना मदतीची आवश्यकता असून राज्य सरकारवर अवलंबून न राहता पालिकेनेच पुढाकार घेऊन विशेष केंद्र स्थापन करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी स्थायी समिती सभागृहात केली.
कुपोषित बालकांचा प्रश्न हा केवळ शहराबाहेर नसून अनेक गरीब वस्त्यांमध्येही अतिकुपोषित बालकांची समस्या आहे. शिवाजीनगर वस्तीतील प्रकल्पाअंतर्गत २०७ कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी याबाबत पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली तेव्हा या बालकांसाठी विशेष योजना करण्याबाबत सकारात्मक धोरण होते. मात्र त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या विषयातून रस काढून घेतल्याचे रईस शेख यांनी सांगितले.
पालिकेच्या शीव रुग्णालयात दरवर्षी ८०० ते ९०० कुपोषित बालकांवर उपचार केले जातात. युनिसेफच्या मदतीने तसेच अनेक सामाजिक संस्थाच्या सहकार्याने चालत असलेल्या या उपक्रमाला पालिकेकडून भक्कम पाठबळाची गरज आहे, असे डॉ. पेडणेकर म्हणाल्या. कुपोषित तसेच अपंग बालकांसाठी पालिकेने विशेष केंद्र उभारावे. अंधेरी येथील अंबिवलीमधील जागा प्रसूतिगृहासाठी राखीव आहे. त्या जागेत हे केंद्र उभारता येईल, अशी सूचना रईस शेख यांनी केली.