कोल्हापुरातील टोल आकारणी रद्द होऊ दे, थेट पाईप लाईन योजना साकारली जाऊ दे, हद्दवाढीचा निर्णय लवकर होऊ दे असे गाऱ्हाणे शहरातील महिलांनी शुक्रवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला घातले. जिल्ह्य़ातील पाच नद्यांचे पाणी कलशाव्दारा मिरवणुकीने आणून त्याचा अभिषेक देवीला घालण्यात आला. महिलांचे हे अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. यामध्ये ३ हजारांहून अधिक महिलांचा समावेश होता.
कोल्हापूर शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी शहरातील महिलांनी आज महालक्ष्मीला साकडे घातले. त्यासाठी सकाळपासूनच महिला मिरजकर तिकटी व भवानी मंडप येथे जमल्या होत्या. पाच नद्यांचे पाणी असलेले कलश घेऊन या महिला सवाद्य मिरवणुकीने मंदिराकडे आल्या. मिरवणुकीने येत असताना टोल आकारणी रद्द व्हावी, थेट पाईप योजना मार्गी लागावी, हद्दवाढीचा निर्णय लवकर व्हावा अशा मागण्यांचा जयघोष केला जात होता. यामध्ये सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांंसह सर्वसामान्य महिलांचाही समावेश होता.    
महालक्ष्मी मंदिरात आल्यानंतर देवीला सुमारे १२ हजार रुपये किमतीचा शालू अर्पण करण्यात आला. पाच नद्यांच्या पाण्याचा जलाभिषेक घालण्यात आला. देवीचे दर्शन घेण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. दर्शन घेत असतानाच महिलांनी देवीसमोर मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले. या उपक्रमात टोलविरोधी कृती समितीच्या कार्यकर्त्यां दीपा पाटील, वैशाली महाडिक, गायत्री निंबाळकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या पद्मा तिवले आदींचा समावेश होता. या उपक्रमासाठी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, बाबा इंदूलकर, रमेश मोरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.