महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या विदर्भाप्रतीच्या पक्षपाती व्यवहारामुळे विदर्भाची अवस्था दयनीय झाली असून आर्थिक व औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे आवश्यक असल्याचा ठराव स्वतंत्र विदर्भ राज्य संकल्प दिनी संमत करण्यात आला.
गोंड राजाचे राज्य ही विदर्भाची प्राचिन ओळख आहे. ब्रिटीश काळातही मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती. भारतच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाचे हे मध्यवर्ती शहर आहे. नागपूर हे राजधानीचे शहर व्हावे ही मागणी असून त्यासाठी उपयुक्त संसाधने येथे आहेत. महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांंच्या पक्षपाती व्यवहारामुळे विदर्भात उद्योगांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे बेरोजगारीची समस्या गंभीर झाली आहे. विदर्भातील शिक्षिक तरुणांना रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे जावे लागत आहे. त्यामुळे विदर्भाचा औद्योगिक विकास होणे आवश्यक असून त्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण होणे आवश्यक असल्याचे या ठरावात म्हटले आहे.  पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सिंचनावर अत्यल्प खर्च होत आहे. भ्रष्टाचारामुळेही विदर्भातील अनेक प्रकल्पांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येची समस्या कायम आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यच ही स्थिती सुधारू शकते. विदर्भातील तीन चतुर्थाश जमीन जंगलाने व्यापली आहे. ‘वाघांची राजधानी’ ही जगात विदर्भाची ओळख आहे. ताडोबा, नवेगाव, नागझिरा जंगल विदर्भाचा प्रमुख भाग आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या विकासासाठी हे महत्त्वाचे साधन आहे.  या वनसंपदेच्या विस्तारासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांद्वारे अत्यल्प खर्च केला जातो. या वनसंपदेच्या आधारे राज्यात अनेक प्रकल्प घेतले जातात. विदर्भावर हा अन्याय आहे. लोह, मँगनीज, चुनखडी आदी खनिजे विदर्भात मुबलक आहेत. मात्र, अतिरिक्त उर्जा प्रकल्पांद्वारे या संसाधनांचा दुरुपयोग केला जात आहे. येथे तयार होणारी वीज विदर्भाबाहेर जाते आणि प्रदूषणाची समस्या येथे गंभीर होत आहे. आशिया खंडाताील सर्वात मोठय़ा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थिती बिघडली आहे. डॉक्टर्स, कर्मचारी व उपकरणांप्रति उदासिन भूमिकेमुळे याचे वैभव लयास गेले आहे. गतवैभव परत मिळविणे आवश्यक आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य हा त्यावर पर्याय असल्याचे या ठरावात नमूद असून विदर्भाच्या सीमांवर ‘विदर्भात आपले           स्वागत आहे’ असे फलक लावण्याचा निर्णय घेण्यात           आला.
राजकुमार तिरपुडे, किरण पातुरकर, आर. एस. भंगू, डॉ. गोविंद वर्मा, डॉ. टी.व्ही. गेडाम, अदमद कादर यांनी हे ठराव मांडले. विदर्भ राज्य संयुक्त कृती समितीतर्फे हा संकल्प दिन आयोजित करण्यात आला होता.