महाबळेश्वरातील बहुचर्चित ‘व्हाईट टॉपिंग’ रस्त्याची धूळधाण

अतिपावसामुळे वारंवार खराब होणारा रस्ता कायमस्वरूपी चांगला राहावा व महाबळेश्वरच्या पर्यटनस्थळी पर्यटकांना सुखकर वाटावे या हेतूने लाखो रुपये खर्चून वन खात्याने ‘व्हाईट टॉपिंग’ या रस्ते बनविण्याच्या अत्याधुनिक तंत्राने बनविलेल्या रस्त्याची येथे सध्या धूळधाण झाली असून, दिवाळी सुट्टीची मौज लुटायला आलेला पर्यटक वनखात्याच्या धुलवडीला चांगलाच वैतागला आहे.

अतिपावसामुळे वारंवार खराब होणारा रस्ता कायमस्वरूपी चांगला राहावा व महाबळेश्वरच्या पर्यटनस्थळी पर्यटकांना सुखकर वाटावे या हेतूने लाखो रुपये खर्चून वन खात्याने ‘व्हाईट टॉपिंग’ या रस्ते बनविण्याच्या अत्याधुनिक तंत्राने बनविलेल्या रस्त्याची येथे सध्या धूळधाण झाली असून, दिवाळी सुट्टीची मौज लुटायला आलेला पर्यटक वनखात्याच्या धुलवडीला चांगलाच वैतागला आहे. ‘व्हाईट टॉपिंग’ या तंत्रामुळे किमान पाच वर्षांची रस्त्याची हमी असताना त्याची एक वर्षांच्या आतच राख होऊन रस्ता खराब झाल्याने वनखात्याच्या वरिष्ठांनी यात त्वरित लक्ष घालून ठेकेदाराला दिली जाणारी रक्कम त्वरित थांबवावी तसेच वाया गेलेला खर्च संबंधितांकडून भरून घ्यावा अशी मागणी येथील निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
गतवर्षीच शासनाच्या नवीन धोरणानुसार व वनखात्याने तयार केलेल्या नियमावलीनुसार पर्यटनस्थळाच्या विकासासाठी वनाधिकारी व त्या भागातील स्थानिक नागरिक यांची संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठण करून त्यांच्या माध्यमातून  पर्यटनस्थळांकडे जाणा-या रस्त्याची दुरुस्ती, तेथील सुशोभीकरण, स्वच्छता, मजबुतीकरण अशी कामे करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार महाबळेश्वर वनपरिक्षेत्राच्या  हद्दीत येणा-या प्रसिद्ध एल्फिस्टन पॉईंट ते ऑर्थरसीट पॉईंट या सुमारे दोन कि.मी. खराब रस्त्याची निवड करून तो चांगला करण्याचे खात्याने ठरविले होते. गतवर्षीच दिवाळी हंगामापूर्वी या कामाचा शुभारंभ होऊन रस्त्याचे काम युद्धपातळीवर करून तो बनविला होता. वनखात्याने यासाठी नेहमीची खडीकरण- डांबरीकरण ही पद्धत न वापरता या रस्त्यासाठी याच क्षेत्रातील व्हाईट टॉपिंग हे अत्याधुनिक तंत्र वापरण्यात आले होते. अशा पद्धतीने (व्हाईट टॉपिंग) तयार केलेला रस्ता कमीत कमी पाच वर्षे तरी जसाच्या तसा राहतो, अशी ख्याती असल्याने वनखात्याच्या वरिष्ठांनी येथील रस्त्यासाठी या तंत्राची निवड केली. इतकेच नव्हे तर हे काम त्यांनी स्थानिकांना न देता या कामातील व तंत्रज्ञानातील अनुभवी तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे मुंबईचे पाठक यांच्या कंपनीला ते देण्यात आले. पाठक यांनी याचे प्रात्यक्षिक वनखात्याच्या अधिका-यांना एका छोटय़ा रस्त्यावर दाखवून त्या कामाच्या दर्जाची व गुणवत्तेची खात्री झाल्यानंतरच वरील दोन कि.मी. रस्त्याचे काम खात्याने पाठक यांना करण्याची परवानगी दिली. ठेकेदार पाठक यांनी युद्धपातळीवर एल्फिस्टन ते ऑर्थरसीट या दोन कि.मी.पैकी सावित्री पॉईंट ते ऑर्थरसीट पॉईंट हा सुमारे दीड कि.मी.चा रस्ता पूर्ण करून उरलेल्या रस्त्यावरील खड्डेही या तंत्राचा वापर करून त्याची डागडुजी केली. या नवीन तंत्रामुळे ऑर्थरसीटकडे जाणारा शेवटच्या टप्प्यातील रस्ता चकाचक झाला. याबद्दल वनखात्याने वाहवाही मिळवली. तसेच हे तंत्रज्ञान महाबळेश्वरसाठी नवीन असल्याने अन्य रस्तेही याच पद्धतीने करावेत अशी येथे चर्चा होत होती. अन्य खात्यातही या तंत्राबद्दल उत्सुकता होती. कारण हे तंत्रज्ञान नेहमीपेक्षा वेगळे आहे असे सांगितले जायचे व त्यास कमीतकमी पाच वर्षे तरी धोका नसतो असे म्हटले जायचे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार व्हाईट टॉपिंग या रस्ते बनविण्याच्या नवीन पद्धतीत रस्ता बनविताना सर्वप्रथम त्यावर डांबरीकरणाचा थर दिला जातो. त्याला अधिक मजबुती येण्यासाठी त्यावर रोलिंग करून व्हॉईट टॉपिंग पावडर व विशिष्ट रसायन वापरून तयार केलेले गरम मिश्रण याचा थर दिला जातो. तो वाळल्यावर दर्जेदार रस्ता तयार होतो. अती पाऊस पडणा-या भागातील रस्त्यांसाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे ते  प्रायोगिकपणे वापरण्यासाठी यातील तज्ज्ञ पाठक यांना काम देण्यात आले होते.
याची यशस्वीता व दर्जा पाहून महाबळेश्वरातील अन्य ठिकाणचे रस्तेही असेच करावेत अशी कामाबद्दल चर्चा चालू होती. नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे आता पाच वर्षे झाली तरी रस्त्याची चिंता नाही, त्याची डागडुजीची  गरज नाही अशा आविर्भावात वनखाते व व्हाईट टॉपिंग तज्ज्ञ पंडित असतानाच नऊ महिन्यांच्या आतच हा संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. रस्ता करताना वापरलेले डांबर कुठल्या कुठे गेले असून, खडी वेगळी झाली आहे. व्हाईट टॉपिंगची पावडरही झाल्याचे दिसत आहे. पूर्वीच्या साध्या रस्त्यापेक्षा त्याची सध्या वाईट अवस्था  झाली असून, या पट्टय़ात धुळीचे साम्राज्य झाले आहे. या धुळीचा फटका मात्र दिवाळी पर्यटनासाठी या नंदनवनासाठी विविध स्वप्ने डोळ्यासमोर ठेवून आलेल्या पर्यटकांना सध्या बसत आहे.
ही वनखात्याची धुलवड मुख्य ऑर्थरसीट पॉईंटच्या शेवटच्याच टप्प्यात सर्वाना अनुभवायला मिळत असल्याने पर्यटक प्रचंड त्रासलेले दिसतात. सध्या हे गिरिस्थान दिवाळी हौशी-मौजींनी बहरले आहे. मात्र  प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वत्र होणा-या वाहतूक  कोंडीशी झगडावे लागत असताना आता त्यांना वनखात्याच्या धुलवडीलाही सामोरे जावे लागत असल्याने ते वैतागल्याचे दिसत आहे. या सा-या त्रासामुळे आपली नियोजित  महाबळेश्वर सहल अर्धवट सोडून परत जावे का, अशा मनस्थितीत यातील अनेकजण असल्याचीही चर्चा आहे. दरम्यान लाखो रुपये खर्च करून वनखात्याने केलेल्या या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी तसेच या कामासाठी ठरलेली रक्कम ठेकेदाराला अदा केली जाऊ नये, तसेच वाया गेलेला खर्च संबंधिताकडून वसूल करावा अशी मागणी स्थानिक जागृत नागरिक, निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी यांच्याकडून  होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Devastation of famous white topping road in mahabaleshwar

ताज्या बातम्या