प्राथमिक शाळांच्या संरक्षण भिंतीचे प्रस्ताव मंजूर करताना काँग्रेसच्या सदस्यांवर झालेल्या अन्यायाकडे लक्ष वेधण्यासाठी पक्षाचे सदस्य परमवीर पांडुळे यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांवर कागदपत्रे व छायाचित्रे भिरकावली. सभेत जि.प.च्या मालकीचा नगर शहराच्या लालटाकी भागातील महाकाय व कोटय़वधी रुपये किमतीचा भूखंड ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर खासगी विकसकाकडून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभा सायंकाळी उशिरापर्यंत चालली. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे होते. पांडुळे यांनी अधिकाऱ्यांवर कागदपत्रे भिरकावल्याने लंघे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृहाची शिस्त पाळण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रस्ताव डावलले गेल्याकडे लक्ष वेधण्यासाठी पांडुळे यांनी सभागृहाबाहेर मिरजगाव व हनुमाननगर (निमगाव गांगर्डा) येथील शाळांची छायाचित्रे डकवली होती. मिरजगाव येथील शाळा राज्यमार्गालगत व हनुमाननगर येथील शाळेलगत कालवा असल्याने विद्यार्थ्यांसाठी कशी धोकादायक परिस्थिती झाली आहे, अशा आशयाची छायाचित्रे होती.
काँग्रेसच्या सदस्यांचे प्रस्ताव डावलले गेल्याची खदखद सभेत शेवटच्या क्षणी व्यक्त झाली. हे प्रस्ताव कोणत्या निकषानुसार मंजूर करण्यात आले, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकषांचे पालन का झाले नाही, अशी विचारणा करत पांडुळे यांनी कागदपत्रे फेकली. बाळासाहेब हराळ, बाबासाहेब दिघे, प्रवीण घुले यांनीही प्रस्ताव मंजूर करताना समान न्याया का लावला नाही, असा प्रश्न करत आम्हाला मंजूर झालेले प्रस्तावही नकोत, अशी भूमिका घेतली. शाळांच्या कंपाऊंडसाठी डीपीसीकडे स्वतंत्र निधी नाही, उपाध्यक्षांनी केलेल्या प्रयत्नामुळे एकच वर्षांसाठी निधी मंजूर झाला. पालकमंत्र्यांकडे अधिक निधीची तसेच डीपीसीकडे यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. तो मंजूर होताच उर्वरित प्रस्तावांनी निधी दिला जाईल, असे लंघे यांनी स्पष्ट केले.
सभेत लालटाकीचा भूखंड घसारा निधीऐवजी बीओटी तत्त्वावरच विकसित करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. सभागृहाच्या मागील कार्यकाळात हराळ बांधकाम समितीचे सभापती असताना हा भूखंड बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा विषय प्रतिष्ठेचा केला होता. परंतु त्या वेळी सदस्यांनी अनेक आक्षेप घेत तो नाकारला व घसारा निधीतून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता पुन्हा बीओटी तत्त्वावर विकसित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे हराळ यांनी आपला प्रस्ताव कसा योग्य होता, याचे समर्थन करत त्या वेळी लंघे यांनी कोणत्या कारणासाठी त्यास विरोध केला होता, असा टोला लगावला. आता या प्रस्तावाचा अहवाल तयार करून तो पुढील सभेत मांडण्याची सूचना लंघे यांनी केली.