‘..तर धनगर समाज बिऱ्हाड आंदोलन करणार’

अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे हा धनगर समाजाचा हक्क असतांना राज्य शासन त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत असल्याची तक्रार करीत

अनुसूचित जमातीच्या सवलती मिळणे हा धनगर समाजाचा हक्क असतांना राज्य शासन त्याची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत असल्याची  तक्रार करीत ३१ जुलैपर्यंत शासनाने धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश न केल्यास राज्यभर जिल्हा व तालुका पातळीवर बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मल्हार सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख मच्छिंद्र बिडकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. देशभरातील अन्य राज्यातील धनगर समाजबांधवांना अनुसूचित जमातीच्या सवलती प्राप्त करून दिल्या जात असतांना महाराष्ट्रात आमच्या हक्कांवर गदा का आणली जात आहे असा प्रश्न बिडकर यांनी उपस्थित केला आहे.
धनगर समाज हा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकद्दष्टय़ा अत्यंत मागास म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने मेंढपाळ हा व्यवसाय असणाऱ्या या समाजाची सदैव भटकंती सुरू असते. त्यामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये या समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात मात्र धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यात टाळाटाळ करून राज्यकर्ते या समाजावर अन्याय करीत असल्याची टीका बिडकर यांनी केली आहे.
प्रदीर्घ काळापासून प्रंलबित या मागणीसाठी समाजातर्फे १५ ते २१ जुलै या कालावधीत पंढरपूर ते बारामती काढण्यात आलेल्या पायी िदडीची शासनाने दखल घेतली नाही. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यासाठी अनुकूलता दर्शविणारे आदिवासी विकास मंत्री आता त्यास विरोध करीत असल्याबद्दल खंत व्यक्त करून शासनाच्या या आडमुठय़ा धोरणाविरूध्द आता गप्प बसणे अयोग्य ठरेल म्हणून समाजातील विविध संघटनांनी एका छताखाली येऊन आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतल्याचे बिडकर यांनी नमूद केले आहे. प्रत्येक रस्त्यावर तसेच सर्व तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयात मेंढय़ा, घोडे, कोंबडय़ा व कुत्री यासह बिऱ्हाड आणून समाजातर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.अभिमन्यू सोनवणे, डॉ. रत्नाकर वाघमोडे, पुंडलिक ढोणे, महेंद्र दुकळे आदी
उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhangar community agitate to scheduled tribe right

ताज्या बातम्या