अपघातातील जखमींवर उपचार करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करत डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला आणि रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. शहरातील देवपुरात असलेल्या प्रथमेश हॉस्पीटलमध्ये भरत बैरागी या अपघातातील जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यास दिरंगाई केली म्हणून बैरागी यांचे साथीदार संजय राठोड व प्रविण भोपे यांच्यासह पाच ते दहा जणांनी रुग्णालयाची तोडफोड केल्याचा आरोप आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेत संशयितांनी डॉ. पराग देवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांच्याकडील सोन्याची साखळी, चार भ्रमणध्वनी असा दीड लाखाचा ऐवज लंपास केल्याची तक्रार आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी आस्था क्रिटीकल केअर सेंटरमधील डॉक्टरांवर अशाच प्रकारचा हल्ला झाला आणि रुग्णालयाचीही तोडफोड करण्यात आली. त्यानंतर देवपूरमधील औषध दुकानांची तोडफोड करून दुकानदारांना मारहाणीच्या घटना घडल्या. वारंवार घडणाऱ्या या घटनांच्या निषेधार्थ विविध संघटनांनी एकत्र येत या मूक मोर्चाचे आयोजन केले होते. डॉ. रवी वानखेडकर, डॉ. निता बियाणी यांच्या नेतृत्वाखाली आयएमए सभागृहापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. शहरात रुग्णालय व डॉक्टरांवर हल्ले करण्याचे प्रकार वाढत आहे. रुग्णालयात धुडगूस घालणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.