चोर सोडून संन्याशाला फाशी

आरडाओरड करणाऱ्याला हटकताच पोलिसांना दमदाटी करत एका युवकाने थेट पोलीस चौकीत धुडगुस घातला. चौकीत प्रवेश करून खुर्ची व अन्य साहित्यासह, पोलीस वाहनांची तोडफोड करत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या युवकाकडे संबंधित यंत्रणेने कानाडोळा केला तर याबद्दल विचारणा करणाऱ्या माध्यम

आरडाओरड करणाऱ्याला हटकताच पोलिसांना दमदाटी करत एका युवकाने थेट पोलीस चौकीत धुडगुस घातला. चौकीत प्रवेश करून खुर्ची व अन्य साहित्यासह, पोलीस वाहनांची तोडफोड करत कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या युवकाकडे संबंधित यंत्रणेने कानाडोळा केला तर याबद्दल विचारणा करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना पोलीस अधिकाऱ्याने कायद्याचा बडगा दाखविल्याने शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
ज्या परिसरात दोन समुहात भीषण दंगल झाली, त्याच भागातील मच्छीबाजार पोलीस चौकीत रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास वडजाई रोड परिसरातील शरीफ उर्फ भूऱ्या अफजल पठाण (२१) या तरूणाने पोलीस चौकीत आरडाओरडा करत प्रवेश केला. त्याला हटकले असता शरीफने पोलिसांना धक्काबुक्की करत चौकीतील खुर्ची, टेबल यांची आदळआपट करत इतर साहित्याची तोडफोड केली. चौकी बाहेर उभ्या असणाऱ्या पोलिसांच्या वाहनालाही धक्का दिला. थेट पोलीस चौकीत येऊन गोंधळ घालणाऱ्या युवकाच्या कृतीकडे खाकी वर्दी परिधान करणाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिसांचा ‘वचक’ हा संपूर्ण घटनाक्रम पाहणाऱ्यांनी अनुभवला.
या घटनेची माहिती मिळताच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. या कालावधीत आझादनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी तेथे आले. त्यांनी वृत्तांकन, छायाचित्रण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना दमदाटी करत त्यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली.
सूचनेचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करू, असा दम भरत सूर्यवंशी यांनी हा संपुर्ण प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलीस चौकीच्या बाहेर घडल्याची सारवासारव त्यांनी शेवटी केली.
संवेदनशील परिसर आणि दंगल काळात रहिवाश्यांसाठी मोठा आधार वाटणाऱ्या मच्छी बाजार पोलीस चौकीचे नुकतेच नुतणीकरण करण्यात आले आहे. ही पोलीस चौकी सूर्यवंशी यांच्या अधिपत्याखाली येते. सूर्यवंशी यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी असा नावलौकीक असताना त्यांच्या अखत्यारीत असलेल्या पोलीस चौकीत असा प्रकार घडावा, हे त्यांचे  अपयश मानले जात आहे. या संदर्भात पोलीस नाईक युनुस खाटीक यांनी तक्रार दिली असून आझाद नगर पोलीस ठाण्यात शरीफ पठाण याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. या संपुर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dhule police punish innocent and released accused