नवरात्रोत्सवाच्या आठव्या दिवशी श्री महालक्ष्मीची महिषासुरमर्दिनी स्वरूपात पूजा बांधण्यात आली. तसेच, तिरूमला देवस्थानकडून आलेला मानाचा शालू महालक्ष्मीला वाजत-गाजत अर्पण करण्यात आला. या सोहळ्यात भाविक उदंड संख्येने सहभागी झाले होते. रात्री देवीची नगरप्रदक्षिणा मंगलमय वातावरणात पार पडली.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी

तिरूपती या देवस्थानाकडून श्री महालक्ष्मीला मानाचा शालू वाजत-गाजत, विधिवत अर्पण करण्यात आला. दुसऱ्या छायाचित्रात करवीर निवासिनी महालक्ष्मी आठव्या दिवशी ‘महिषासुरमर्दिनी’ स्वरूपात पूजा बांधण्यात आली. (छाया-राज मकानदार)

महालक्ष्मीला तिरूपती देवस्थानकडून मानाचा शालू अर्पण करणे ही परंपरा आहे. रूसलेल्या महालक्ष्मीला पती बालाजीकडून शालूची भेट दिली जाते, अशी यामागे आख्यायिका आहे. हा शालू दसऱ्यादिवशी देवीच्या पूजेसाठी वापरला जातो व नंतर त्याचा लिलाव केला जातो. तिरूमला देवस्थानचे मानकरी मानाचा शालू घेऊन भवानी मंडपातून महालक्ष्मी मंदिराकडे आले.                              हा शालू घेत असतांना तो भाविकांनी वाजत-गाजत नेला. शालू हाती घेतलेल्या तिरूमला देवस्थानच्या मानक ऱ्याच्या डोक्यावर छत्र धरले होते. हा शालू विधिवत महालक्ष्मीला अर्पण करण्यात आला. या वेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी सचिव, निवासी जिल्हाधिकारी संजय पवार, समितीचे पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.
दरम्यान, रात्री महालक्ष्मीची नगरप्रदक्षिणा परंपरेप्रमाणे पार पडली. रथामध्ये उत्सव मूर्ती विराजमान झाली होती. ती महाद्वारातून बाहेर पडली. प्रदक्षिणेच्या मार्गावर उभ्या असलेल्या भाविकांनी फुलांची उधळण केली. मंगलवाद्यांच्या निनादात व मानक ऱ्यांच्या समवेत ही प्रदक्षिणा सुमारे दीड तासाहून अधिक काळ सुरू होती.