नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीत लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वत:च्या जीवावर उदार होऊन संकटात सापडलेल्या नागरिकांची सुटका करतात. मात्र काही वेळेस अग्निशमन दलाकडे असणारी आधुनिक यंत्रणाही कमी पडते आणि वेळेवर मदत न पोहोचू शकत नाही. अशा वेळी संकटात सापडलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॉप्टरचा खूप उपयोग होऊ शकतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी परवानगी दिली तर आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या मुंबईकरांची सुटका करण्यासाठी आकाशात हेलिकॉप्टर भिरभिरताना दिसू शकतील.
मुंबईत झालेल्या ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी हेलिकॉप्टरच्याच मदतीने लष्कराचे जवान आणि कमांडो उतरले होते. नुकत्याच उत्तराखंडातील महाप्रलयातही हेलिकॉप्टरचे महत्त्व आणि आवश्यकता अधोरेखित झाली. या पाश्र्वभूमीवर मुंबईतही आणीबाणीच्या परिस्थितीत हेलिकॉप्टरची मदत घेतली तर संकटात सापडलेल्या नागरिकांची वेळेवर सुटका करता येईल, असा एक मतप्रवाह पुढे येत आहे. महापौर सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गेल्या वर्षी पाठविलेल्या निवेदनात हीच मागणी केली होती. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाला हेलिकॉप्टरची आवश्यकता असल्याचे सांगून प्रभू यांनी मुंबई शहरासाठी तीन हेलिकॉप्टर देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे या निवेदनात केली होती. अर्थात याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान काँग्रेसच्या नगरसेविका उषा कांबळे यांनीही एका ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिका प्रशासनाकडे पालिकेच्या आपत्कालीन विभागासाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याची सूचना केली आहे. महापालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेत ती मांडली जाईल. मुंबईतील गगनचुंबी इमारतींना लागणारी आग, पूरपस्थिती, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये नागरिकांची सुटका करण्यासाठी या हेलिकॉप्टरचा चांगला फायदा होईल, असे कांबळे यांचे म्हणणे आहे.
कांबळे यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेवर अभ्यास करून या विषयी निर्णय घेण्यात येईल, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.