सोलापूर जिल्ह्य़ासह परिसरातील पाच जिल्ह्य़ांच्या ३३ तालुक्यांसाठी अतिशय गरजेच्या असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पासंदर्भात वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून केवळ श्रेयवादासाठी या चांगल्या प्रकल्पाच्या बदनामीचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मंडळींनी आखला आहे. त्यासाठी दुसऱ्या-तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा वापर होत असून हा प्रकार सोलापूर जिल्ह्य़ाच्या विकासाला घातक ठरणारा असल्याचा आरोप माढा तालुक्यातील जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी केला.
राष्ट्रवादीच्या एका गटाशी जवळीक ठेवून असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष उत्तम जानकर व जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाशी संबंधित काही तांत्रिक मुद्यांवर सवाल उपस्थित केला होता. या पाश्र्वभूमीवर जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी, राष्ट्रवादीअंतर्गत गटबाजीच्या राजकारणातून कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला बदनाम केले जात असल्याचा आरोप केला. केवळ श्रेयवादातून संबंधित राष्ट्रवादीच्या मंडळींनी आपल्या गटाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना पुढे करून वाद पेटविण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असेही मत त्यांनी मांडले.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला २००४ साली सोलापूर जिल्ह्य़ातील सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील हे दोघे अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री असताना शासनाने मान्यता दिली होती. त्या वेळी या प्रकल्पाच्या बऱ्याच तांत्रिक मुद्यांवर विचार झाला होता. यात आणखी काही तांत्रिक मुद्दे व त्रुटी असतील तर त्यावर विचार करण्यासाठी शासनाकडे तज्ज्ञ अधिकारी उपलब्ध आहेत. केंद्रीय जलआयोगाकडे नेमके कोणत्या योजनेचे प्रस्ताव जातात याचा अभ्यास प्रथम नेत्यांनी करावा. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचा खटाटोप करू नये, असे आवाहनही अनिल पाटील यांनी केले.
ते म्हणाले,‘‘स्थिरीकरण योजनेच्या बाजूने जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचा एक गट सध्या सह्य़ांची मोहीम राबवित आहे, तर दुसरा गट इतरांना श्रेय मिळू नये, या योजनेचा पाठपुरावा करणारा नेता शिल्पकार ठरू नये म्हणून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण खेळत आहे. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखालील दुसऱ्या सिंचन आयोगाने भीमा आणि सीना खोरे हे सर्वाधिक तुटीचे खोरे असल्याने या खोऱ्यात मुबलक पाणी असलेल्या खोऱ्यातून पाणी वळविण्याची शिफारस केली होती. त्याचा विचार करता कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना उपयुक्त आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्य़ासाठी आवश्यक असलेले पाणी सध्या पुणे जिल्ह्य़ात वळविले जात आहे.यंदा जानेवारी महिन्यात पुणे जिल्ह्य़ातून उजनी धरणात पाणी सोडले असते तर सोलापूर जिल्ह्य़ातील दुष्काळाची तीव्रता वाढली नसती. केवळ बारामतीकरांमुळेच उजनी धरणात पाणी येऊ शकले नाही. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाच्या तांत्रिक मुद्यांवर सवाल उपस्थित करणाऱ्या मंडळींनी प्रथम बारामतीकरांच्या पाणी न सोडण्याच्या धोरणावर बोलावे,’’ असा टोलाही पाटील यांनी मारला.