मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी नाटकांची परंपरा जवळजवळ थांबल्यासारखीच झाली आहे. ते हयात असतानाच खरं तर तिला घरघर लागली होती. त्यांनी स्वत:ही आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात काळाची निकड जाणवून मालवणी नाटकांचा हात सोडून देत मराठी नाटकांची निर्मिती केली होती. (त्या नाटकांतूनही ते मूळ संहिता धाब्यावर बसवून आपली भूमिका मालवणीत सादर करीत, ही गोष्ट वेगळी!) दिगंबर नाईक या हरहुन्नरी नटाने बाबूजींचा मालवणी नाटकांचा हा वारसा आपल्या परीनं पुढे नेण्याची धडपड चालवली आहे. अर्जुन काशीराम मेस्त्री लिखित, प्रशांत विचारे दिग्दर्शित ‘दिसता तसा नसता’ हे नाटक याच कुळीतलं आहे.
तशी या नाटकाची गोष्ट काहीशी भोंगळच आहे. म्हणजे यातला रंगनाथ ऊर्फ रंग्या हा मालवणी मुलखातला दशावताराने पछाडलेला तरुण. आपली दशावतारी कंपनी असावी, या दिवास्वप्नात सतत मग्न असलेला. कंपनी काढायचं सोडाच; पण त्याला दशावतारी खेळातही कुणी काम देत नाही. त्याच्या आयुष्यात एकमेव बरी गोष्ट घडलीय ती म्हणजे- एकेकाळी तमाशात नाचणाऱ्या शेवंताशी त्याचं लगीन झालंय. आज ना उद्या शेवंताला घेऊन दशावतारी कंपनी काढायचा त्याचा निर्धार पक्का आहे. दशावतारात स्त्रीपार्टी नट काम करतात. परंतु आपण मात्र खरीखुरी स्त्री शेवतांच्या रूपात दशावतारात सादर करायची असं त्यानं ठरवलेलं असतं.
त्याच्या मनातले हे मांडे प्रत्यक्षात मात्र काही उतरत नाहीत. तशात त्याच्या लग्नाला पाच वर्षे उलटूनही घरात पाळणा न हलल्यानं त्याची आई सारखी त्याच्यामागे तगादा लावून आहे. गावातल्या बायकाही शेवंताला वांझोटी म्हणून सणासमारंभाला बोलावणं टाळतात. या सगळ्यामुळे शेवंताही घायकुतीला आलीय. सगळे उपाय करूनही पाळणा हलेना म्हणताना रंग्याही आतून मोडून पडलाय.
तशात एके दिवशी रंग्या सकाळी झोपेतून उठतच नाही. त्याच्या अकस्मात मृत्यूनं घरावर आकाश कोसळतं. त्याची आई, बायको उघडय़ावर पडतात. दोघींच्या आकांताने गाव गोळा होतो. त्याच्या अंत्यसंस्कारांची तयारी केली जाते. आणि काय चमत्कार! रंग्या झोपेतून जागा व्हावा तसा चक्क उठून बसतो.                                 
तिकडे देवलोकांत या घटनेमुळे एकच खळबळ माजते. यमाने त्या दिवशीच्या कोटय़ातला एक जीव वाटेतच सांडल्याने चित्रगुप्ताचा जन्म-मृत्यूंचा हिशेब बोंबलतो. यमाच्या हलगर्जीपणामुळे रंग्या पुन्हा जिवंत होतो आणि तिकडे देव हादरतात. कालचक्राचं रहाटगाडगं कोलमडून पडतं.
आता यावर उपाय काय? विष्णुदेव यमासह चित्रगुप्त, नारद, स्वर्गलोकीचा चॅनलवाला धूतपापेश्वर आणि कामदेव अशा सर्वानाच या अक्षम्य गुन्ह्य़ाबद्दल चांगलंच फैलावर घेतो आणि ‘तुमची ही चूक तुम्हीच निस्तरा..’ म्हणून फर्मावतो. देवलोकीची ही समस्त मंडळी रंग्याला पुन्हा स्वर्गात घेऊन जाण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात.  
रंग्याची बायको शेवंता ही मूळची स्वर्गलोकीची अप्सरा मदनिका असते. भलत्या समयी कामदेवासोबत शंृगाररत झाल्याबद्दलची शिक्षा म्हणून विष्णूने दिलेल्या शापाने ती पृथ्वीवर सामान्य स्त्री म्हणून जन्माला आलेली असते. कामदेव तिच्या विरहाने बेचैन होतो. तिचा सहवास लाभावा म्हणून तो व्याकूळ झालेला असतानाच रंग्याचे प्राण हरण करण्याच्या निमित्ताने पृथ्वीतलावर येण्याची संधी त्याला मिळते. तिचा फायदा उठवत रंग्याच्या देहात प्रवेश करून मदनिकेचा सहवास मिळवायचा असं तो ठरवतो. रंग्याही आपल्याला मूल व्हावं म्हणून आतुरलेला असतोच. तोही कामदेवाच्या साहाय्यानं पौरुष प्राप्त करून शेवंता व आईची इच्छा पुरी करण्याचं ठरवतो. त्याचवेळी, ही स्वर्गलोकीची मंडळी आपले प्राण हरण करायला आली आहेत याचीही त्याला पूर्ण जाणीव असते. तो मोठय़ा डोकॅलिटीनं त्यांच्याकडून आपल्या प्राणांचं दान पदरी पाडून घेतो. आणि वर ओरिजिनल देव, नारद, यम वगैरे मंडळी यानिमित्ताने आयतीच आपल्या तावडीत सापडलीयत, तर त्यांना घेऊन दशावतारी मंडळी काढायचं आपलं स्वप्न का पुरं करून घेऊ नये, असा विचार तो करतो. त्यांनाच मग तो दशावताराच्या तालमींना जुंपतो. रंग्याच्या या धोबीपछाड डावाने देवमंडळींची गोची होते. रंग्याच्या या भूलभुलय्यातून बाहेर पडून त्याला स्वर्गात कसं न्यावं, या पेचात ते सापडतात..
काय होतं पुढे..?  
लेखक अर्जुन काशीराम मेस्त्री यांनी लोककथेचा फॉर्म घेऊन हे नाटक रचलं आहे खरं; परंतु त्यातल्या कथेची तार्किक सांधेजोड मात्र त्यांना विश्वसनीय करता आलेली नाही. कामदेवाच्या गोष्टीचं ठिगळ शेवटपर्यंत नीटसं उलगडत नाही. बाकी मालवणी दशावतारी मसाला त्यांनी नाटकात ठासून भरला आहे. दिगंबर नाईकांसारखा हरहुन्नरी अभिनेता त्यांच्या हाताशी असल्याचा त्यांनी पुरेपूर लाभ उठवला आहे. नाटकातील विनोदाचे पंचेस चांगले असले तरी एकूण कथानकाची गोधडी विणताना त्यांना खूप कष्ट पडले आहेत. छोटय़ा छोटय़ा प्रसंगांतून मनोरंजनाचे भुईनळे उडविण्यात मात्र त्यांनी कसूर केलेली नाही. परंतु नाटकाची बांधणीच विशविशीत असल्यानं अधूनमधून प्रेक्षकांचं लक्ष नाटकातून उडतं. परिणामी उरते ती व्हरायटी एन्टरटेन्मेंटची कसरत! ती सर्व कलाकारांनी बऱ्यापैकी जमवली आहे.
दिग्दर्शक प्रशांत विचारे यांनीसुद्धा नाटकाच्या बांधणीकडे म्हणावं तितकं लक्ष दिलेलं नाही. त्यांनीही मुख्य नटावरच आपलं लक्ष केन्द्रित केल्यानं इतरांच्या कामांत उंच-सखलपणा आला आहे. त्यामुळे प्रयोगात ढिसाळपणा जाणवतो. नाटकात संघर्ष नसेल तर नाटय़पूर्णता तरी हवीच. ती आणण्याचा आटापिटा दिगंबर नाईकांच्या अतिवापरातून दिग्दर्शकानं केलेला आहे. त्याऐवजी सगळ्या कलाकारांच्या एकजीव सादरीकरणाकडे त्यांनी लक्ष पुरवलं असतं तर नाटक अधिक चांगलं झालं असतं. असो.
नेपथ्यकार अशोक पालेकरांनी वास्तववादी, सांकेतिक आणि सूचक अशा त्रिविध मिश्रणातून विविध नाटय़स्थळं निर्माण केली आहेत. प्रशांत कदम आणि नीलेश जाधव यांनी दशावतारी खेळाचं आघाती संगीत व ठेकेबाज नृत्यं चांगली दिलीत. रमेश चाळके यांची वेशभूषा आणि दत्ता भाटकरकृत रंगभूषा यथार्थवादी आहे. विजय गोळे यांची प्रकाशयोजनाही प्रसंगानुकूल. दिगंबर नाईक यांनी रंग्याच्या भूमिकेत मालवणी सम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या चतुरस्रतेची आणि त्यांच्या अष्टावधानी अभिनयाची आठवण करून दिली. स्त्रीवेशातही ते दिसलेत छान; परंतु आवाजात मार खातात. रंग्याचं मूल नसण्याचं दु:ख आणि ते मनाआड करून दशावतारी कंपनी काढण्याचं त्याचं वेड, देवांना युक्तीनं घोळात घेऊन त्यांच्याकडून आपल्याला हवं ते पदरी पाडून घेण्याची त्याची डोकॅलिटी.. धमाल! संवादोच्चारांवरची त्यांची हुकूमतही वाखाणण्याजोगी. शेवंता झालेल्या धनश्री दळवी त्यांना जेवढय़ास तेवढी साथ करतात. त्या जर भूमिकेत आणखीन घुसल्या असत्या (अर्थात संहितेच्या पाठबळासह!) तर नाटक अधिक पकड घेऊ शकलं असतं. अन्य कलाकारांमध्ये यम झालेले गणेश मयेकर विनोदाची चांगली जाण दर्शवतात. सुनील गायकवाडांचा नारद सानुनासिक उच्चारांमुळे लक्ष वेधतो. सुरेश चव्हाण यांनी साकारलेला उत्तर भारतीय ढंगाचा चित्रगुप्त वेगळेपणामुळे उठून दिसतो. सचिन नारकर (धूतपापेश्वर), मीनल सावंत (आई), सुनील अष्टेकर (कामदेव), विलास सावंत (विष्णू) आणि स्वप्नाली मोहिते (नर्तकी) यांनी आपली कामं ठीक केली आहेत.

jalgaon, raver lok sabha seat, rohini khadse, eknath khadse, facebook page, remove father s image, ncp sharad pawar, bjp, maharashtra politics, lok sabha 2024, election 2024, marathi news,
रोहिणी खडसे यांच्या फेसबुक पानावर एकनाथ खडसे यांच्या छायाचित्रास फाटा
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?