मतदानाच्या पुर्वसंध्येपासून मतदारांना पैसे वाटपाचे सत्र जोमात सुरू असताना भरारी पथकांची भरारी ही प्रलोभने दाखविणाऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. काही ठिकाणी अचानक छापे टाकून भरारी पथकांनी कारवाई केली. परंतु, चौकशीअंती त्यात फारसे काही आढळून आले नाही. अनेक खुष्कीचे मार्ग वापरत उमेदवारांनी मतदारांना प्रलोभने दाखविण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या ‘विश्वासू’ कार्यकर्त्यांनी घरोघरी मतदारांची शिरगणती करत थेट त्यांच्या हाती पैसे देण्याचे प्रयत्न केले. काहींनी आपल्या घरातच तिजोरी उघडून मतदार चिठ्ठी पाहून पैसे दिले तर काहींनी हॉटेलच्या स्वयंपाकगृहात मतदारांना तृप्त करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकार गोरगरीबांच्या वस्तीसह कामगार वसाहतीत जसे घडले, तसेच सुशिक्षितांच्या काही भागातही घडले. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवारांची चढाओढ लागली. मतदानाची मुदत संपुष्टात येईपर्यंत मतदारांना लक्ष्मी दर्शन घडत होते, भरारी पथकांना मात्र त्याचे दर्शनच झाले नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या पूर्वसंध्येला मतदारांना वेगवेगळी प्रलोभने दाखवून आत्कृष्ट करण्याचे प्रयत्न झाले. त्यात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश होता. निवडणूक काळात राज्यात कोटय़वधीची रोकड पकडली गेली असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र महामार्ग व इतरत्र वाहनांची तपासणी करूनही फारसे काही पथकांच्या हाती लागले नव्हते. किमान मतदानावेळी प्रलोभने दाखविण्याच्या प्रकारांवर हे पथक र्निबध आणेल, अशी सुजाण मतदारांची अपेक्षा होती. पण, तसे काही घडले नसल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. नाशिक पश्चिम मतदार संघात वेगवेगळ्या उमेदवारांकडून मतदारांना लक्ष्मीदर्शन घडल्याची चर्चा आहे. या मतदारसंघाचा काही भाग कामगार वसाहतीचा तर काही भाग सुशिक्षित असा आहे. मंगळवारी रात्री सिडको परिसरात रात्र आहे की दिवस असे वातावरण होते. उमेदवारांच्या प्रचार कार्यालयावर युवकांचे जत्थेच्या जत्थे ठाण मांडून होते. नागरीक व महिलांची एकच लगबग सुरू होती. या ठिकाणी जमलेल्या बहुतेकांच्या हाती मतदार चिठ्ठी पहावयास मिळाली. ही चिठ्ठी दाखवून हवे ते पदरात पडत असल्याचे नांव न सांगण्याच्या अटीवर काहींनी सांगितले. याच भागातील एका उमेदवाराने आपल्या घरात मतदार चिठ्ठी पाहून पैसे वाटप केल्याचे सांगण्यात आले. त्याच्या निवासस्थानी उशिरापर्यंत अक्षरश: जत्रा भरली होती. एका उमेदवाराने घरातील मतदारांची संख्या पाहून प्रती व्यक्ती ५०० रुपयांप्रमाणे रक्कम अगदी घरपोहोच केल्याचे सांगण्यात आले. कामगार वसाहतीप्रमाणे इंदिरानगर, राणेनगर या सुशिक्षित मतदारांच्या भागातही घरोघरी उमेदवारांचे विश्वासू कार्यकर्ते भ्रमंती करत होते. हाती मतदार यादी घेऊन संबंधितांनी प्रत्येक घराचा दरवाजा ठोठावत मतदार संख्येनुसार पैसे तात्काळ पैसे वाटप करण्याची तयारी दर्शविली. काही सुजाण मतदारांनी मात्र त्यांना दाद दिली नाही.
दिवाळीच्या तोंडावर आलेल्या मतदानामुळे झोपडपट्टीतील रहिवाशांची चांदी झाली. रिंगणातील बहुतेक उमेदवारांकडून त्यांना लक्ष्मी दर्शनाचा योग आला. यामुळे दिवाळी दणक्यात साजरी होणार असल्याची त्यांची भावना होती. नाशिक मध्य मतदारसंघात गल्लीतील मतदारांना हॉटेलच्या स्वयंपाक गृहात हजेरी लावण्यास सांगण्यात आले. याच ठिकाणी मतदार चिठ्ठी पाहून मतदारांची भूक भागविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. मतदानावेळी मतदारांना प्रलोभने दाखविले जाऊ नये म्हणून भरारी पथकांची स्थापना करण्यात आली. या भरारी पथकांची वाहने अव्याहतपणे फिरत होती. काही जणांना त्यांनी पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले. परंतु, चौकशीत अनेक प्रकरणात तथ्य आढळून आले नसल्याचे सांगितले गेले. मतदानासाठी कोणी लाच देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची तक्रार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संनियंत्रण कक्षातर्फे १०७७ क्रमांक उपलब्ध केला होता. या क्रमांकावर मतदानाच्या पूर्वसंध्येला पैसे वाटप होत असल्याचे काही दुरध्वनी आले. त्यात हिरावाडी भागात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याची तक्रार होती. पिंपळगाव बहुला, महिरावणी भागात एका वाहनातून आलेल्यांकडून पैसे वाटप होत असल्याची तक्रार होती. अन्य काही मतदार संघात हे प्रकार घडल्याच्या तक्रारी आल्या. संनियंत्रण कक्षाने त्याची माहिती त्या त्या मतदारसंघातील भरारी पथक व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देऊन प्रक्रियेचा सोपस्कार पार पाडला.